मराठवाड्यात आजवर ६८ टक्के पाऊस; ऑगस्ट महिन्याची सुरुवात कोरडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 13:55 IST2021-08-05T13:51:59+5:302021-08-05T13:55:16+5:30
Rain in Marathwada : जून आणि जुलै या दोन महिन्यात मराठवाड्यात ३२० मि.मी. सरासरीच्या तुलनेत ४६५ मि. मी. पाऊस झाला

मराठवाड्यात आजवर ६८ टक्के पाऊस; ऑगस्ट महिन्याची सुरुवात कोरडी
औरंगाबाद : यंदाच्या पावसाच्या हंगामात मराठवाड्यात आजवर सरासरीच्या तुलनेत ६८ टक्के पाऊस झाला आहे. पावसाळा ऋतू सुरू होऊन दोन महिने उलटले असून, ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा कोरडा गेल्याने विभागात पर्जन्यमानाचा टक्का वाढला नाही.
यंदा ‘ॲटोमेटिक वेदर स्टेशन’द्वारे पावसाची सरासरी घेतली जात आहे. त्यामुळे मंडलनिहाय पावसाची आकडेवारी देण्याऐवजी तालुकानिहाय आकडेवारी संकलित केली जात आहे. त्यात सरासरी झालेला पाऊस आणि टक्केवारी इतकी त्रोटक माहिती प्रशासनासमोर आणते आहे. तसेच विभागातील काही जिल्ह्यातील वार्षिक पर्जन्यमानाची सरासरीदेखील कमी करण्यात आली आहे. औरंगाबाद ६७५वरून ५८१ मि.मी. अशी वार्षिक सरासरी आता गृहीत धरण्यात आली आहे. जालना आणि बीडची सरासरी कमी करण्यात आली आहे. विभागाची एकूण सरासरी ६७९ मि. मी. असून, त्या आधारावर आजपर्यंत जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या अनुमानावर ६८ टक्के पाऊस झाल्याची आकडेवारी प्रसिध्दीस देण्यात आहे.
जून आणि जुलैमध्ये झालेला पाऊस
जून आणि जुलै या दोन महिन्यात मराठवाड्यात ३२० मि.मी. सरासरीच्या तुलनेत ४६५ मि. मी. पाऊस झाल्याचे अहवालात नमूद आहे. १४५ टक्के पाऊस झाल्याचे अहवालात म्हटले आहे. ऑगस्टमध्ये विभागात ८.४ टक्के पाऊस झाला आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत औरंगाबाद जिल्ह्यात ५८१ मि.मी., जालना ६०३ मि.मी., बीड ५०६, लातूर ७०६, उस्मानाबाद ६०३, नांदेड ८१४, परभणी ७६१, तर हिंगोलीत ७९५ मि.मी. सरासरी पावसाचे अनुमान गृहीत धरले आहे. आजवर औरंगाबादमध्ये वार्षिक सरासरीच्या ५७ टक्के, जालना ७८ टक्के, बीड ६९ टक्के, लातूर ६१ टक्के, उस्मानाबाद ५७ टक्के, नांदेड ७५ टक्के, परभणी ७५ टक्के, तर हिंगोलीत ७० टक्के पाऊस झाल्याचा अहवाल विभागीय प्रशासनाने शासनाला दिला आहे.