मराठवाड्यात कर्जमाफीचे १११६.४४ कोटी पडून; शेतकऱ्यांचे बँकांमध्ये खेटे घालणे सुरूच आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 06:58 PM2018-07-12T18:58:42+5:302018-07-12T19:02:00+5:30
मराठवाड्यातील एकूण ११.२१ लाख अर्जदार शेतकऱ्यांपैकी ९.६१ लाख शेतकऱ्यांना ३ हजार ९७८.९२ कोटी रुपयांचा लाभ कर्जमाफीपोटी मिळाला आहे.
औरंगाबाद : मराठवाड्यातील एकूण ११.२१ लाख अर्जदार शेतकऱ्यांपैकी ९.६१ लाख शेतकऱ्यांना ३ हजार ९७८.९२ कोटी रुपयांचा लाभ कर्जमाफीपोटी मिळाला आहे. याशिवाय १.५९ लाख शेतकऱ्यांना मंजूर झालेले १११६.४४ कोटी रुपये अजुनही बँकांच्या खात्यात पडून आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे बँकांमध्ये खेटे घालणे सुरूच आहे.
औरंगाबाद व लातूर येथील विभागीय कार्यालयातून माजी साखर सहआयुक्त के. ई. हरदास यांनी मिळविलेल्या माहितीवरून हे वास्तव समोर आले आहे.
औरंगाबादेत १३३ कोटी बँकांमध्ये पडून
औरंगाबाद जिल्ह्यातील दहा हजार लाभार्थी शेतकऱ्यांचे १३३ कोटी रुपये बँकेत पडून आहेत. मात्र जिल्हा बँकेने ४ कोटी रु. शासनाला परत केलेले आहेत, असे दिसून येते.
जालन्यात ३६५ कोटी पडून
जालना जिल्ह्याला ९६०.३७ कोटी रु. मंजूर झाले. पण शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात फक्त ५९५.३५ कोटी रु.जमा झाले आहेत. तसेच ३६५.०२ कोटी रु. पूर्ततेअभावी बँकेच्या खात्यात पडून आहेत. ही टक्केवारी ४० टक्के इतकी आहे. त्यापैकी जिल्हा बँकेने ७०.०४ कोटी शासनाला परत करण्याची घाई केली.
हिंगोली : २३९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर
हिंगोली जिल्ह्यात प्राप्त २६०.७२ कोटींपैकी २३९.४३ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याचा दावा शासन व प्रशासनाकडून केला जात आहे. जिल्ह्यात ६६ हजार ३३९ शेतकऱ्यांना २६०.७२ कोटींची कर्जमाफी मंजूर झाली आहे. २७८ शेतकऱ्यांचे दोन कोटी ३२ लाख रुपये शिल्लक आहेत.
बीड : ७३७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर
बीड जिल्ह्यातील १ लाख ५४ हजार ८७० शेतकऱ्यांना ७३७.०७ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली असून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे.
लातूर जिल्ह्यात ३७८ कोटींची कर्जमाफी
लातूर जिल्ह्यासाठी ५१६ कोटी २४ लाख रुपये कर्जमाफीसाठी प्राप्त झाले असून, लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या १ लाख ५२ हजार ७४० आहे. मात्र त्यापैकी १ लाख ३९ हजार ७९४ शेतकऱ्यांना ३७८.८२ कोटींची कर्जमाफी करण्यात आली आहे. जिल्ह्यात १२ हजार ९४७ शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे. बहुदा हे शेतकरी वन टाईम सेटलमेंटच्या योजनेत येत असावेत, असा जिल्हा उपनिबंधकांचा अंदाज आहे.
उस्मानाबाद : ८८ हजार ६४६ शेतकऱ्यांना लाभ
उस्मानाबाद जिल्ह्यातील ८८ हजार ६४६ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे़ या शेतकऱ्यांचे २९६ कोटी ६९ लाख रूपयांचे कर्ज माफ झाले आहे़ १२ हजार ८४६ लाभार्थी शेतकऱ्यांना मंजूर झालेले सुमारे १३०.४४ कोटी रूपये बँकेच्या खात्यात पडून आहेत.
नांदेड : १ लाख ३० हजार ३५३ शेतकऱ्यांच्या अर्जावर निर्णय नाही
नांदेड जिल्ह्यात १ लाख ३५ हजार ६४७ शेतकऱ्यांच्या खात्यावर ७०१ कोटी ८५ लाख रुपये जमा करण्यात आले आहे. अर्ज भरलेल्या १ लाख ३० हजार ३५३ शेतकऱ्यांच्या कर्जमाफी अर्जावर शासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. दुसर वनटाईम सेटलमेंट योजनेला जिल्ह्यात अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
परभणी : निम्म्या शेतकऱ्यांनाही मिळाला नाही लाभ
परभणी जिल्ह्यातील १ लाख ३४ हजार ९०३ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे़ विशेष बाब म्हणजे जिल्ह्यात ३ लाख शेतकरी आहेत़ जिल्ह्यात एकूण सातबाराधारक शेतकऱ्यांची संख्या ३ लाख ४७ हजार असून त्यापैकी १ लाख ३४ हजार ९०३ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाला आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यावर ७४५ कोटी ७३ लाख रुपये जमा झाले आहेत़