मराठवाडा साहित्य परिषदेचे ग्रंथ पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 08:07 PM2020-06-19T20:07:20+5:302020-06-19T20:07:47+5:30
पोस्टाने घरपोच पाठविणार सन्मानचिन्ह व रकमेचे धनादेश
औरंगाबाद : मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने २०२० च्या ग्रंथ पुरस्कारांची घोषणा गुरुवारी मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केली. डॉ. देवकर्ण मदन, डॉ. बाळू दुगडूमवार, मनोज बोरगावकर, चंद्रकांत वानखेडे, संदीप जगदाळे, सोपान हाळमकर, जगदीश कदम, सुनीताराजे पवार आदींना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. यंदा कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सन्मानचिन्ह व पुरस्काराच्या रकमेचे धनादेश पुरस्कार विजेत्यांना पोस्टाने घरपोच पाठविण्यात येणार आहेत.
नरेंद्र मोहरीर वाङ्मय पुरस्कार डॉ. देवकर्ण मदन यांच्या ‘मराठवाड्यातील साहित्य, समीक्षा आणि संशोधन’ या ग्रंथाला व डॉ. बाळू दुगडूमवार यांच्या ‘बाबा आमटे : व्यक्तित्व, कवित्व व कर्तृत्व’ या ग्रंथांना विभागून जाहीर करण्यात आला आहे. ५ हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार नांदेड येथील मनोज बोरगावकर यांच्या ‘नदिष्ट’ या कादंबरीला जाहीर झाला आहे. नागपूर येथील चंद्रकांत वानखेडे यांच्या ‘गांधी का मरत नाही’, या ग्रंथाची निवड प्राचार्य म. भि. चिटणीस वाङ्मय पुरस्कारासाठी झाली आहे. कुसुमताई देशमुख काव्य पुरस्कारासाठी पैठण येथील संदीप जगदाळे यांच्या ‘असो आता चाड’ या कविता संग्रहाची निवड करण्यात आली आहे. बीड येथील सोपान हाळमकर यांच्या ‘वाढण’ या कथा संग्रहाची निवड बी. रघुनाथ कथा, कादंबरी पुरस्कारासाठी झाली आहे. उत्कृष्ट नाटक किंवा नाट्य समीक्षेला देण्यात येणारा कुमार देशमुख नाट्य पुरस्कार नांदेड येथील जगदीश कदम यांच्या ‘वडगाव लाईव्ह’ या नाटकासाठी आणि सुनंदा गोरे यांच्या ‘नवी प्रतिज्ञा’ या बालनाट्यासाठी विभागून देण्यात येणार आहे. या सर्व पुरस्करांचे स्वरुप ३ हजार रुपये रोख असे आहे.
रा. ज. देशमुख स्मृती पुरस्कार पुणे येथील प्रकाशक सुनीताराजे पवार यांना देण्यात येणार असून, २ हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रा. शेषराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीने ही ग्रंथ निवड केली असून, या समितीमध्ये डॉ.सुरेश सावंत, डॉ.जयद्रथ जाधव, डॉ. संगीता मोरे, डॉ. संभाजी पाटील, डॉ. ज्ञानदेव राऊत यांचाही समावेश होता. रा. ज. देशमुख स्मृती पुरस्काराची निवड प्रकाशक के. एस. अतकरे आणि डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी केली.