पंगतीमध्ये बसलेल्या मराठवाड्याला ओळखीचा ‘वाढपी’ मिळालाच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 07:53 PM2024-09-18T19:53:52+5:302024-09-18T19:54:06+5:30
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन विशेष:
- डाॅ. शिरीष खेडगीकर
‘पंगतीमध्ये वाढपी ओळखीचा असेल तर जेवणाऱ्याला दोन-चार लाडू जास्त मिळतात, मराठवाड्याच्या ताटात आता विकासाचे पदार्थ पडतील’ असे मराठवाड्याचे भूमिपुत्र माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख आपल्या भाषणातून नेहमी सांगायचे; परंतु गेल्या काही वर्षांपासून विकासाच्या लाडूची वाट पाहत पंगतीमध्ये बसलेल्या मराठवाड्याला ओळखीचा ‘वाढपी’ मिळालाच नाही, अशी आज मराठवाड्यातील सर्वसामान्य जनतेची भावना झाली आहे.
संवैधानिक तरतुदीमुळे मराठवाड्याला माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्या कारकीर्दीत वैधानिक विकास मंडळ मिळाले. दुर्दैवाने आज त्याचा फक्त सांगाडा शिल्लक आहे. गतवर्षी १७ सप्टेंबर रोजी अमृतमहोत्सवी मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या ४६ हजार ५७९ कोटी ३४ लक्ष रुपयांच्या ‘पॅकेज’चे काय झाले? गतवर्षी घोषित केलेल्या वेगवेगळ्या प्रकल्पांची सद्य:स्थिती काय आहे, याचा पाठपुरावा मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी करणे अपेक्षित आहे. ७६ वर्षांत मराठवाड्याला काय मिळाले, या प्रश्नाचे उत्तर देताना दळणवळणाच्या सुविधा, चौपदरी महामार्ग इत्यादी गोष्टींमुळे काही प्रमाणात झालेली सोय वगळता अन्य सर्व क्षेत्रांमध्ये मराठवाड्याला अजूनही खूप दूरचा पल्ला गाठायचा आहे. पूर्वी मला माझ्या गावी, अंबाजोगाईला जाण्यासाठी बसने आठ तास लागत. आता चारचाकीने मी चार तासांत तेथे जातो. तालुक्यांची गावे ‘बायपास’ झालीत; परंतु रस्त्यावर लागणाऱ्या खेड्यांमध्ये, तेथील लोकांमध्ये फारशी सुधारणा झाल्याचे दिसत नाही.
ग्रामीण शाळांची गुणवत्ता, तेथील शैक्षणिक सुविधा, खेड्या-पाड्यांमधील आरोग्यविषयक सुविधा आदींची पाहणी केल्यानंतर निराशा होते. नदीजोड प्रकल्प आणि ‘वाॅटरग्रीड’सारख्या जलसिंचनाच्या योजना केवळ कागदावरच राहिल्या. रेल्वे आणि हवाई प्रवासाच्या सुविधा वाढल्या; परंतु पर्यटन क्षेत्राचा विकास झाला नाही. औद्योगिक वसाहती निर्माण झाल्या; परंतु आजही मराठवाड्यातील हजारो तरुण अभियंते नोकरीसाठी पुण्या-मुंबईचा किंवा विदेशाचा रस्ता गाठतात. हे स्थलांतर कधी थांबणार?
इ.स. १७२४ पासून १९४८ पर्यंत जवळजवळ सव्वादोनशे वर्षे आणि त्यानंतरही १९५६ पर्यंत हैदराबाद हीच मराठवाड्याची राजधानी होती. मराठवाड्याचा अनुशेष काढताना पश्चिम महाराष्ट्र किंवा विदर्भाशी तुलना करणे आता उपयोगाचे नाही. हैदराबादचा तेथील डोळस राज्यकर्त्यांनी केलेला डोळे दिपवून टाकणारा औद्योगिक विकास मराठवाड्यातील जुन्या-जाणत्या लोकप्रतिनिधींनी डोळे उघडून एकदा पाहावा आणि पंगतीत बसलेल्या मराठवाड्याच्या ताटात विकासाचे गोडधोड वाढावे, हीच आजच्या मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी शुभेच्छांसह अपेक्षा.
(लेखक छत्रपती संभाजीनगर येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेचे विश्वस्त आहेत)