मुदतवाढ न मिळाल्याने मराठवाडा वैधानिक विकास मंडळात आता उरले केवळ तीन कर्मचारी!
By स. सो. खंडाळकर | Published: April 8, 2024 04:43 PM2024-04-08T16:43:07+5:302024-04-08T16:44:27+5:30
घटनात्मक तरतुदीनुसार हे मंडळ अस्तित्वात यावे, यासाठी गोविंदभाई श्रॉफ, विजयेंद्र काबरा यांच्यासारख्यांनी केलेला संघर्ष आता केवळ आठवणींपुरता शिल्लक राहिलेला आहे.
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा वैधानिक विकास मंडळ आता फक्त नावालाच शिल्लक उरले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयालगतचे मंडळाचे कार्यालय आता ओसच पडले आहे. तिथे कुणी येते ना जाते.
३० जूनला या मंडळाचे सदस्य सचिव विजयकुमार फड निवृत्त झाले. ते पदोन्नतीने आयएएस दर्जा प्राप्त केलेले अधिकारी होते. आयएएस मिळताच ते धाराशिव जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाले आणि अवघ्या काही महिन्यांतच त्यांची बदली मराठवाडा वैधानिक विकास मंडळात झाली. खरे तर ही ‘साइड पोस्ट’. चांगल्या पोस्टची प्रतीक्षा करीतच त्यांना निवृत्त व्हावे लागले. मंडळाला मुदतवाढ नसल्यामुळे फड यांनाही दररोज कार्यालयात जाऊन बसणे, एवढेच काम करावे लागले. ते वारकरी संप्रदायाचे व कीर्तनकार असल्याने त्यांना कार्यालयातही ज्ञानेश्वरी वा अन्य ग्रंथ वाचत बसण्याशिवाय पर्यायच नव्हता. ही अवस्था आहे वैधानिक विकास मंडळाची.
सध्या किरण गिरगावकर यांच्याकडे फड यांचा पदभार आहे. ते अर्थ व सांख्यिकी कार्यालयाचे सहसंचालक आहेत. पण त्यांच्याकडे विभागीय आयुक्त कार्यालयातील नियोजन उपायुक्त व वैधानिक विकास मंडळाचे सदस्य सचिव या पदांचा अतिरिक्त कार्यभार आहे.
कृष्णा भंडारी हे त्यांचे पीए व महसूल विभागातील एक महिला कर्मचारी सोडले तर आता वैधानिक विकास मंडळात कुणीच कर्मचारी नाहीत. मंडळाची सारी इमारत ओस पडलेली आहे. एक काळ होता, या मंडळात राबता होता.
अध्यक्ष असताना मराठवाडाभरातून लोक यायचे. विविध समित्या कार्यरत होत्या. त्यांच्या सदस्यांच्या सतत बैठका चालू असायच्या. आता बंद असल्यागतच हे मंडळ आहे. ते सुरू होण्याची लोकभावना असतानाही शासनकर्त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. घटनात्मक तरतुदीनुसार हे मंडळ अस्तित्वात यावे, यासाठी गोविंदभाई श्रॉफ, विजयेंद्र काबरा यांच्यासारख्यांनी केलेला संघर्ष आता केवळ आठवणींपुरता शिल्लक राहिलेला आहे.