शिक्षक मतदारसंघ निवडणूक; भाजप, राष्ट्रवादीत बंडखोरीची शक्यता, अनेक इच्छुकांनी अर्ज घेतले
By विकास राऊत | Published: January 11, 2023 11:53 AM2023-01-11T11:53:19+5:302023-01-11T11:54:31+5:30
अर्ज भरण्यासाठी आता २ दिवस उरले आहेत
औरंगाबाद :मराठवाडाशिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रदीप सोळुंके यांनी, तर नांदेडमधील भाजपचे पदाधिकारी नितीन कुलकर्णी यांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. यांनी अद्याप अर्ज दाखल केले नसले, तरी १२ जानेवारी रोजी यांचे अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिक्षक सेनेचे मनोज पाटील यांनी मंगळवारी शिक्षकांच्या विविध मागण्यांचा हार गळ्यात घालून उमेदवारी अर्ज दाखल केला. आतापर्यंत सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस उरले आहेत.
या निवडणुकीसाठी गुरुवारपासून (दि. ५) आतापर्यंत २५ जणांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. यात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार किरण पाटील यांनी सोमवारी अर्ज दाखल केला. ते १२ जानेवारीला पुन्हा अर्ज भरणार आहेत. विद्यमान आ.काळे यांची ७ फेब्रुवारीला मुदत संपणार असल्याने निवडणूक होत आहे. आ.काळे यांनी उमेदवारी अर्ज नेला असून, अद्याप दाखल केलेला नाही; तसेच प्रदीप सोळुंके यांनीही अर्ज घेतला आहे. अर्जाची छाननी १३ जानेवारीला होईल. अर्ज मागे घेण्याची मुदत १६ जानेवारीपर्यंत आहे. मतदान ३० जानेवारीला असून, मतमोजणी २ फेब्रुवारीला होणार आहे. निवडणुकीसाठी प्रत्येक तालुक्यात १५ ते १६ विविध समित्या स्थापन केल्या आहेत. मतदान प्रक्रियेपर्यंत जवळपास १,२०० कर्मचारी असतील. ६१,५२९ मतदारांसाठी विभागात मूळ २२२ आणि सहायक ५ अशी एकूण २२७ मतदान केंद्रे निश्चित केली आहेत.
१६ जानेवारीनंतर चित्र होईल स्पष्ट
१६ जानेवारीनंतर या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. अर्ज मागे घेण्यासाठी या तारखेची मुदत आहे. त्यामुळे अर्ज कुणी नेले, यापेक्षा माघार कोण घेणार, यानंतरच निवडणुकीत थेट सामाना होणार की तिरंगी, चौरंगी होणार याचे चित्र स्पष्ट होईल.