मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुक: १४ उमेदवार, ६१ हजार मतदार; सकाळच्या सत्रात संथ सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 11:48 AM2023-01-30T11:48:07+5:302023-01-30T11:49:49+5:30

गुरुजी निवडणार आमदार; मराठवाड्यात २२७ केंद्रांवर मतदान सुरु 

Marathwada Teachers Constituency Election: 14 candidates, 61 thousand voters; A slow start in the morning session | मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुक: १४ उमेदवार, ६१ हजार मतदार; सकाळच्या सत्रात संथ सुरुवात

मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुक: १४ उमेदवार, ६१ हजार मतदार; सकाळच्या सत्रात संथ सुरुवात

googlenewsNext

औरंगाबाद : मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आज, सोमवारी (३० जानेवारी) सकाळी ८ वाजेपासून २२७ मतदान केंद्रांवर मतदान सुरु  झाले आहे. या निवडणुकीत एकूण १४ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, ६१ हजार ५२९ मतदारांना मत देण्याचा अधिकार आहे. मतदान सायंकाळी ४ वाजेपर्यंत असून सकाळच्या सत्रात संथ प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. 

२ फेब्रुवारीला चिकलठाणा एमआयडीसीमध्ये मतमोजणी होणार आहे. राजकीय पक्ष, संघटनांसह अपक्षांमुळे बहुरंगी निवडणूक होत आहे. शनिवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर प्रमुख उमेदवारांनी गुप्त बैठकांवर भर दिला. दरम्यान, आज सकाळी महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांनी लातूर येथे, भाजपचे उमेदवार किरण पाटील यांनी औरंगाबाद तर मराठवाडा शिक्षक संघाचे उमेदवार सुर्यकांत विश्वासराव यांनी कंधार तालुक्यातील प्रियदर्शिनी हायस्कुलमध्ये मतदानाचा हक्क बजावला. सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत ११.१४ टक्के मतदान झाले आहे. हीच गती राहिली तर ५० टक्क्यापर्यंत मतदान होण्याची शक्यता आहे. 

आठ जिल्ह्यांत एकूण २२२ मूळ, तर ५ सहायक अशी एकूण २२७ मतदान केंद्रे आहेत. मतदानानंतर सर्व मतपेट्या सील करून पोलिसांच्या बंदोबस्तात चिकलठाण्यातील मतमोजणी केंद्रातील स्ट्राँग रूमकडे पाठविण्यात येतील. २ फेब्रवारीला सकाळी मतमोजणी सुरू होईल. औरंगाबादमध्ये ५३, जालन्यात १५, परभणीत १८, हिंगोलीत १२, नांदेडमध्ये ३०, बीडमध्ये ३४, लातूरमध्ये ४०, उस्मानाबादमध्ये २५ अशी एकूण २२७ मतदान केंद्रे आहेत. मतदान केंद्रावर अखंडितपणे व्हिडिओग्राफी व वेबकास्टिंग केले जाणार आहे. पसंतीक्रमानुसार मतदान करण्याची मुभा मतदारांना आहे. मतमोजणीच्या वेळी उमेदवाराच्या मताची सरमिसळ करून मतमोजणी होणार असल्याने मतदाराचे मत गोपनीय राहणार आहे.

मतदार ओळखपत्राशिवाय १० पुरावे ग्राह्य
निवडणुकीत मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र सादर करू शकत नाहीत, त्यांना ओळख पटविण्यासाठी इतर १० कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य असल्याचे, असे निवडणूक आयोगाने कळविले आहे. यात आधार कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, पासपोर्ट, आस्थापनांचे ओळखपत्र, लोकप्रतिनिधी ओळखपत्र, मतदारसंघातील संस्थासेवांचे ओळखपत्र, विद्यापीठ पदवी-पदविका प्रमाणपत्र, दिव्यांगत्व मूळ प्रमाणपत्र, केंद्र शासनाचे युनिक डिसॅबिलिटी ओळखपत्र ग्राह्य धरण्याबाबत निवडणूक आयोगाने कळविले आहे.

मराठवाड्यातील जिल्हानिहाय मतदार असे......
जिल्हा - पुरुष मतदार - महिला मतदार – एकूण मतदार
औरंगाबाद - ८७०५            - ५२१९ - १३९२४
जालना - ४१८६            - ८५१ - ५०३७
परभणी - ३७९८            - ६७४ - ४४७२
हिंगोली - २५८०             - ४८० - ३०६०
नांदेड - ७००८             - १८१३ - ८८२१
बीड - ७७५०            - २०१९ - ९७६९
लातूर - ८५२७            - २७३७ - ११२६४
उस्मानाबाद - ४२२६             - ९५६ - ५१८२
एकूण - ४६७८० - १४७४९ - ६१५२९

Web Title: Marathwada Teachers Constituency Election: 14 candidates, 61 thousand voters; A slow start in the morning session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.