संशोधनात मराठवाड्याचा डंका! जगातील प्रभावशाली शास्त्रज्ञांमध्ये सहा जणांचा समावेश
By राम शिनगारे | Published: September 1, 2023 12:28 PM2023-09-01T12:28:32+5:302023-09-01T12:29:10+5:30
स्टॅनफर्ड विद्यापीठाकडून २ टक्के शास्त्रज्ञांची यादी जाहीर; भास्कर साठेंची हॅटट्रिक, तर संगशेट्टीचा चौकार
छत्रपती संभाजीनगर : अमेरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठाने २०२३ या वर्षातील जगभरातील २ टक्के प्रभावशाली शास्त्रज्ञांची यादी जाहीर केली आहे. त्यात एकूण २ लाख शास्त्रज्ञ असून, भारतातील ३५०० जणांचा समावेश झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयातील पाच तर नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील एका प्राध्यापकानेही बाजी मारली आहे.
अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात स्टॅनफर्ड विद्यापीठाची स्थापना १८८५ साली झाली. हे विद्यापीठ मागील काही वर्षांपासून जगभरातील संशोधन करणाऱ्या प्रभावशाली शास्त्रज्ञांची यादी जाहीर करते. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रसायनशास्त्राचे डॉ. भास्कर साठे यांची सलग तिसऱ्यांदा निवड झाली. तसेच भौतिकशास्त्र विभागातील डॉ. के. एम.जाधव (सेवानिवृत्त) आणि डॉ. प्रविणा उगले-पवार यांचाही यादीत समावेश आहे. शहरातील वाय.बी. चव्हाण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील डॉ. जयप्रकाश संगशेट्टी यांचा सलग चौथ्यांदा तर सेवानिवृत्त झालेले शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.के. मौर्य यांचाही यादीत समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरातील पाच जणांशिवाय मराठवाड्यातील नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागातील डॉ. राजाराम माने यांचाही समावेश आहे. या प्राध्यापकांची निवड संशोधनाचा दर्जा ठरविणारे जगप्रसिद्ध स्कोपस एच इंडेक्स, इम्पॅक्ट फॅक्टर आणि एकूण सायटेशनची (संशोधनाचा वापर) संख्या यावर केली आहे.
देशात 'आयआयसी' तर राज्यात पुणे विद्यापीठ आघाडीवर
स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या यादीत भारतातील बंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्थेतील (आयआयसी) ११२ जणांचा समावेश आहे. त्यानंतर आयआयटी दिल्ली ८९, आयआयटी खरगपूर ८३, आयआयटी मुंबई ६३, भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर ३८, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ १५, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर १०, मुंबई विद्यापीठ ३ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ५, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील २ जणांचा समावेश आहे.
'एडी सायंटिफिक' इंडेक्समध्ये ४२ जण
'एडी सायंटिफिक' इंडेक्स हेसुद्धा जगभरातील महत्त्वाचे शास्त्रज्ञ आणि विद्यापीठांची रॅकिंग जाहीर करते. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ४२ प्राध्यापक व विद्यार्थी संशोधकांचा समावेश २०२३ च्या यादीत केला आहे. या ४२ जणांमध्येही स्टॅनफर्ड विद्यापीठातील जाहीर केलेल्या यादीतील सर्वांचा समावेश आहे.