मराठवाडा वॉटरग्रीडची अंमलबजावणी होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 02:01 PM2024-08-03T14:01:05+5:302024-08-03T14:04:01+5:30

टोयोटो कंपनी येत आहे. आणखी येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिल्लोड येथे दिली.

Marathwada Watergrid will be implemented; Testimony of Chief Minister Eknath Shinde | मराठवाडा वॉटरग्रीडची अंमलबजावणी होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

मराठवाडा वॉटरग्रीडची अंमलबजावणी होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा वॉटर ग्रीडची आजवर फक्त चर्चाच व्हायची. पण या योजनेची अंमलबजावणी आता सुरू होणार आहे. जिल्ह्यात उद्योगासाठी मोठी गुंतवणूक होत असून रोजगारनिर्मिती होणार आहे. टोयोटो कंपनी येत आहे. आणखी येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिल्लोड येथे दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांचे शुक्रवारी दुपारी १ वाजता चिकलठाणा विमानळावर आगमन झाले. तेथून ते मोटारीने सिल्लोडला रवाना झाले. मंत्री अतुल सावे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, आमदार प्रदीप जैस्वाल, मनपा प्रशासक जी. श्रीकांत आदींनी त्यांचे स्वागत केले.

लाभाचे प्रातिनिधिक वितरण
या सोहळ्यात विविध योजनांच्या लाभार्थी महिलांना प्रमाणपत्राचे व लाभाचे प्रातिनिधिक स्वरुपात वितरण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये गीताबाई जंजाळ, वर्षा बाळू पांडव, लक्ष्मीबाई पंडित, करुणा बारवाल, संगीता अंभोरे, मीराबाई सपकाळ, दिव्या सपकाळ, मनीषा अहिरे, अखिला याकूब शेख, शोभा दांडगे आदी महिला लाभार्थ्यांचा समावेश होता.

स्वतः मुख्यमंत्र्यांनी भरला दिव्याचा फॉर्म
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी दिव्या रामदास सपकाळ या बहिणीचा फॉर्म स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरला आणि त्यावर तिची सही घेऊन तो फॉर्म जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे मंजुरी प्रक्रियेसाठी सुपूर्द केला.

पारंपरिक वेशभूषेतील बहिणी आणि रक्षाबंधनही
महिला पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत्या. अनेक महिलांनी व्यासपीठावर जाऊन मुख्यमंत्र्यांना राखी बांधली व त्यांच्याशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी सर्व महिलांना मोबाईल टॉर्च सुरू करण्याचे आवाहन केले. त्यास महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सिल्लोडमध्ये सत्तार यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमानतळापासून सिल्लोड येथे येईपर्यंत रस्त्यात लागणाऱ्या प्रत्येक गावात स्वागत करण्यात आले. तेथेही महिलांनी त्यांना ओवाळले व राखी बांधली. प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी केले तर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीची माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सादर केली. संचालन गीता पानसरे यांनी केले. आभार विकास मीना यांनी मानले.

 

Web Title: Marathwada Watergrid will be implemented; Testimony of Chief Minister Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.