दीड वर्षात मराठवाड्याचे चित्र बदलेल; मुख्य अभियंता सुरकुटवार यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 03:34 PM2018-04-28T15:34:26+5:302018-04-28T15:36:41+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मराठवाडा प्रादेशिक विभागातील रस्त्यांचे चित्र येत्या दीड-दोन वर्षांत पूर्णत: बदललेले असेल, असा दावा मुख्य अभियंता एम.एम.सुरकुटवार यांनी केला.
औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागाच्यामराठवाडा प्रादेशिक विभागातील रस्त्यांचे चित्र येत्या दीड-दोन वर्षांत पूर्णत: बदललेले असेल, असा दावा मुख्य अभियंता एम.एम.सुरकुटवार यांनी केला. ३० एप्रिल रोजी ते सेवानिवृत्त होत असून, सुट्यांमुळे त्यांच्या प्रशासकीय सेवेचा २७ एप्रिल हाच शेवटचा दिवस ठरला. अलीकडच्या काही वर्षांत सी.डी.फकीर यांच्यानंतर मुख्य अभियंता या पदावरून निवृत्त होणारे सुरकुटवार हे दुसरे अभियंते आहेत.
दोन वर्षांत त्यांनी विभागाची विस्कटलेली घडी बसविण्याचा प्रयत्न केला. मराठवाड्यात केलेल्या कामकाजाबाबत समाधानी असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, येथे रुजू झालो तेव्हा परिस्थिती वेगळी होती. १ हजार कोटींहून अधिक रुपयांची कामे या दोन वर्षांत सुरू केली. गोदावरी व पूर्णा नदीवरील ८ ते १० पुलांचे बांधकाम पूर्ण झाले. अंबाजोगाई येथील हॉस्टेल, बाह्यरुग्णालय, हिंगोली, बीड येथील कोर्ट, कळमनुरी हॉस्पिटल इमारतीचे काम पूर्ण झाले. २०० कोटींच्या इमारत बांधणीची निविदा प्रक्रिया पूर्ण होत असून, महिनाभरात ती कामे सुरू होतील. १ हजार कि़मी.चे नवीन रस्ते या दोन वर्षांत विभागात झाले आहेत. आगामी काळात अॅन्युटीमधून मोठ्या प्रमाणात रस्ते होतील.खड्डेमुक्त मराठवाडा यासाठी खूप परिश्रम घेतल्याचा दावा त्यांनी केला. रस्ते आणि इमारतींसह २ हजार कोटींच्या आसपासचा निधी शासनाने विभागामध्ये दिला आहे. शिल्लक कामांची देणी ५० टक्क्यांवर आणल्यामुळे मोठा भार हलका झाला आहे. याच शिस्तीत पुढे काम चालले, तर विभागाचा फायदा होईल.
चांगले अधिकारी आल्यास गती
पैठण रोडची डागडुजी, लिंकरोडपर्यंत काँक्रिटीकरण, परळीतील रस्ते, उदगीर, परतूर येथील रेल्वे उड्डाणपूल, फुलंब्रीतील पुलांचे बांधकाम, नांदेड जिल्ह्यातील माहूर बायपास, भोकरमधील सिमेंट रस्ते, जालना ते भोकरदन रस्ता, ही कामे गतीने केली. शासनाने विभागात मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. त्यामुळे पुढील दीड-दोन वर्षांत विभागातील इमारती व रस्त्यांचे चित्र बदललेले असेल. चांगले अधिकारी, अभियंते या विभागात आल्यास कामांना मोठी गती मिळेल. येत्या काळात शासन रिक्त पदांची भरती करील, फे्रश कर्मचारी विभागाला मिळतील. त्यामुळे आणखी गुणवत्तापूर्ण कामे होतील, अशी अपेक्षा मावळते मुख्य अभियंता सुरकुटवार यांनी व्यक्त केली.