मराठवाड्याला ‘अर्थ’ संजीवनी; राष्ट्रीयीकृत बँकांच्या परिषदेला औरंगाबादेत सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 12:58 PM2021-09-16T12:58:44+5:302021-09-16T13:00:31+5:30
Rashtriya Bank Parishad in Aurangabad : या परिषदेमुळे बँकांचा सीएसआर मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात खर्च होण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता
औरंगाबाद : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड ( Bhagwat Karad ) यांच्या उपस्थितीत राष्ट्रीयीकृत बँकांची एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेला आज सकाळी औरंगाबादेत सुरुवात झाली, अशा प्रकारची राष्ट्रीय परिषद पहिल्यांदाच मराठवाड्यात होत असल्याने या प्रदेशाच्या कृषी, औद्योगिकीकरणास ‘अर्थ’ संजीवनी मिळण्याची शक्यता आहे. ( Rashtriya Bank Parishad in Aurangabad )
या परिषदेमुळे बँकांचा सीएसआर मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात खर्च होण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता असून मुद्रालोन, पीककर्जातील गुंतागुंत कमी करून लक्ष्यपूर्तीसाठी प्रयत्न करणे, जनधन योजनेतून खातेदारांना फायदे देणे आणि कृषी प्रक्रिया उद्योगांसाठी बँकांकडून कर्ज उपलब्ध होण्यासाठी सहकार्य होण्यासारखे काही महत्त्वाचे निर्णय या परिषदेतून होण्याची शक्यता आहे.
पर्यटनस्थळ विकास, घृष्णेश्वर मंदिर परिसरात लाईट व साऊंड शोसाठी बँकांचा सीएसआर वापरणे, पायाभूत सुविधांच्या विकासात बँकांचे योगदान मिळणे शक्य होणार आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा नवउद्योजकांना लाभ व्हावा, प्रधानमंत्री सुरक्षा योजना, जनधन योजना प्रभावी राबवावी, डिजिटल ट्रान्सफर कसे करता येईल, यासह शेतकरी बँक कर्ज योजनांवर परिषदेत मंथन होणार आहे.
या परिषदेला १२ राष्ट्रीय बँकांच्या अध्यक्षांची उपस्थिती आहे. यात बँकांच्या विविध विषयांवर चर्चा होणार आहे. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये होणाऱ्या या परिषदेत सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत बैठका आणि चर्चासत्र होणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली आहे.
फडणवीस, दानवे यांच्या उपस्थितीत समारोप
संध्याकाळी ५ वा. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व राष्ट्रीय बँकेचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत या परिषदेची सांगता होणार आहे.