मराठवाड्याच्या हक्काचे विदर्भात जायला नको
By Admin | Published: October 5, 2016 01:05 AM2016-10-05T01:05:18+5:302016-10-05T01:17:27+5:30
औरंगाबाद : मराठवाड्याच्या हक्काच्या संस्था विदर्भामध्ये पळविण्याचे काम सुरूअसून, मराठवाड्याच्या हक्काचे या प्रदेशातच राहिले पाहिजे,
औरंगाबाद : मराठवाड्याच्या हक्काच्या संस्था विदर्भामध्ये पळविण्याचे काम सुरूअसून, मराठवाड्याच्या हक्काचे या प्रदेशातच राहिले पाहिजे, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. गेल्या चार-पाच दिवसांतील पावसामुळे मराठवाड्यातील शेतकरी संकटात सापडला असून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याचे ते म्हणाले.
राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सकाळी फडणवीस यांची भेट घेऊन मराठवाड्यातील विविध मागण्यांचे निवेदन दिले. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, आयआयएम, विधि विद्यापीठ आणि स्कूल आॅफ प्लॅनिंग आणि आर्किटेक्क या संस्था विदर्भात गेल्या आहेत. सध्या अनेक योजना विदर्भात पळविण्याचे काम सुरूआहे.
मराठवाड्यात परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने तातडीने एकरी मदत जाहीर केली पाहिजे. फुटलेले पाझर तलाव दुरुस्तीसाठी मदत केली पाहिजे. विदर्भात डबघाईस आलेल्या काही बँकांना ज्याप्रमाणे केंद्र सरकारची मदत राज्य सरकारने मिळवून दिली त्याच पद्धतीने मराठवाड्यातील डबघाईस आलेल्या जिल्हा बँकांनाही मदत मिळावी. मराठवाड्यात रेशीम उद्योग भरभराटीस येत असून, त्याला मदत करण्याची तसेच मराठवाड्यात टेक्स्टाईल पार्क उभे करण्यासंदर्भात आम्ही निवेदनाद्वारे मागणी केली असल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले.
मंत्रिमंडळ बैठकीआधी राज्य सरकारने मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींची बैठक बोलवावी, अशी मागणी आम्ही केली होती. मात्र, ती सरकारने साफ धुडकावून लावली. एवढेच नाही तर आपण स्वत: दोन दिवसांपूर्वी मराठवाड्यातील प्रश्नांसंदर्भात भेट मागूनही ती टाळली जात होती. शेवटी ती देण्यात आली, असे ते म्हणाले.
पत्रकार परिषदेला आ. राजेश टोपे, आ. सतीश चव्हाण, आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, आ. अमरसिंह पंडित, आ. विक्रम काळे, आ. विजय भांबळे, आ. रामराव वडकुते उपस्थित होते. ४
भगवानगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्यात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना समाजासमोर मार्गदर्शन करू देण्यावरून सध्या मोठा वाद आहे. यासंदर्भात मुंडे यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. मी गडाचा केवळ एक भक्त आहे, असे ते म्हणाले. बीड जिल्ह्यात माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ मोर्चा निघाला तर नक्की सहभागी होईन, असे ते म्हणाले.