मराठवाड्याच्या डॉप्लर रडारला मिळेना हवामान खात्याचे सिग्नल
By विकास राऊत | Published: December 8, 2023 06:59 PM2023-12-08T18:59:15+5:302023-12-08T18:59:28+5:30
कुणीच बोलेना : तारीख पे तारीखच्या खेळात सगळे काही रखडले
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यासाठी मंजूर झालेले एक्स किंवा सी- बॅण्ड डॉप्लर रडार बसविण्यासाठी केंद्र शासनाने मंजुरी देऊन दीड वर्ष उलटले आहे. मात्र दिल्ली आणि मुंबईतील हवामान खात्यातील काही महाभागांच्या अंतर्गत राजकारणामुळे रडार बसविण्यास ग्रीन सिग्नल मिळत नसल्याची माहिती आहे.
चार वर्षांपासून मराठवाड्यात अतिवृष्टी, ढगफुटी होत असून, सुमारे १ लाख हेक्टरवरील खरीप हंगामाची माती झाली. यंदा तर पावसाने दडीच मारल्याने खरीप हंगाम गेला, तर रब्बी हंगामात अवकाळी पावसाने पिकांची माती केली.
मराठवाड्यातील हवामानाचे स्वतंत्ररीत्या संशोधन आणि विश्लेषण होण्यासाठी एक्स किंवा सी-बॅण्ड डॉप्लर रडार बसविण्याची मागणी पुढे आली. शेती पावसावर अवलंबून असल्यामुळे हवामानाचा अचूक अंदाज मिळणे गरजेचे आहे. मात्र, तो मिळत नसल्याने लहरी हवामानाचा परिणाम शेती व औद्योगिक विकासावर झाला.
दहा महिन्यांपासून ठप्प
आयएमडी विभागाच्या पथकाने १४ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील म्हैसमाळ, शुलीभंजन, भांगसीमाता गड, गोगाबाबा टेकडी व कच्ची घाटी, सातारा परिसरातील जागांची पाहणी केली. दिल्लीतील अधिकाऱ्यांनी पाहणी अहवाल दिला. जुलै महिन्यात म्हैसमाळ येथील उंच जागा आयएमडीने निश्चित केली. जागेच्या मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे गेला. मात्र, पुढे काहीच नाही.
काही सांगता येणार नाही
मराठवाड्यातील रडार कधी बसेल, कोणते बसेल, यावर मला काही सांगता येणार नाही. याबाबत विज्ञान मंत्रालयच सांगू शकेल. -डॉ.अनुपम कश्यप, आयएमडी इन्चार्ज, पुणे.
लोकमत करीत आहे पाठपुरावा
जून, २०२१ पासून लोकमत वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून पाठपुरावा करीत आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी लोकमतच्या वृत्ताची दखल घेत, केंद्रीय पृथ्वी व विज्ञान मंत्रालयाकडे पाठपुरावा केल्यानंतर, ५० कोटींच्या खर्चातून चार्तून सी-डॉप्लर बॅण्ड रडार बसविण्यासाठी मार्च, २०२२ मध्ये मंजुरी मिळाली.
एक्स बॅण्ड रडार बसविणे गरजेचे
अवकाळी पावसाने अतोनात नुकसान केले. बोटांएवढ्या आकारमानाच्या ढगात किती बर्फ कण, पाण्याची वाफ, थेंब आहेत. याचा एक्स-रे रडार काढते. कोणत्या अक्षांश, रेखांशावर किती वाजता, किती मिलीमीटर पाऊस पडेल, ढगफुटी होणार की दुष्काळ पडणार, हे त्यातून कळते. सी-बॅण्ड डॉप्लर रडार मराठवाड्यात बसविण्याच्या हालचाली सुरू असून, त्याऐवजी एक्स बॅण्ड रडार बसविणे गरजेचे आहे.
-प्रा.किरणकुमार जोहरे, हवामान शास्त्रज्ञ.