मराठवाड्यातील पहिली तान्हुल्यांसाठी आईच्या दुधाची बँक छत्रपती संभाजीनगरात
By संतोष हिरेमठ | Published: June 1, 2023 12:20 PM2023-06-01T12:20:00+5:302023-06-01T12:20:46+5:30
नवजात शिशूंना मिळणार आईच्या दुधाची शक्ती, महिनाभरात कार्यान्वित
छत्रपती संभाजीनगर : आईचे दूध म्हणजे नवजात शिशूसाठी अमृतच मानले जाते. मात्र, दुर्दैवाने अनेक शिशूंना अनेक कारणांमुळे आईचे दूध मिळत नाही. परंतु अशा शिशूंना मानवी दूध बँकेद्वारे आईचे दूध मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाड्यातील पहिली मानवी दूध बँक साकारण्यात आली असून, महिनाभरात ती कार्यान्वित होणार आहे.
छत्रपती संभाजीनगरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) ही मानवी दुधाची बँक सुरू करण्यात येणार आहे. दरवर्षी १ जून रोजी संपूर्ण जगभरात दूध दिवस साजरा केला जातो. मानवी शरीराला दुधाची असलेली गरज आणि त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठीच जागतिक दूध दिन साजरा केला जातो. जन्मानंतर नवजात शिशूला आईचे दूध दिले जाते. जन्मानंतर सुरुवातीचे किमान सहा महिने बाळाला आईचे दूधच दिले जाते. घाटी रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात दरवर्षी ३ हजार ते ३५०० अत्यवस्थ नवजात बालकांवर उपचार केले जातात. प्रसूतिशास्त्र विभागात दररोज ६०-७० प्रसूती होतात. त्यातील दररोज १० ते १२ नवजात शिशू या विभागात दाखल होत असतात. प्रसूतीनंतर अनेक मातांना पुरेसे दूध येत नाही, काहींना उपचारामुळे शिशूंना दूध पाजता येत नाही. अशावेळी शिशूला गायीचे अथवा पावडरचे दूध पाजण्याची वेळ ओढवते. परंतु शिशूंना आईचेच दूध मिळावे, यादृष्टीने ‘हृमन मिल्क बँक’ साकारण्यात आली. यात आईचे दूध संकलित करून त्यावर आवश्यक ती प्रक्रिया करून ते गरजू शिशूंना दिले जाणार आहे.
दुधाचे महत्त्व अन् फायदे...
दूध हा शरीरासाठी एक आवश्यक आणि पौष्टिक घटक मानला जातो. दूध प्यायल्यामुळे शरीराला तातडीने ऊर्जा मिळते. दूध हा शरीरासाठी आवश्यक सर्व पोषणतत्त्वांचा अतिशय चांगला स्रोत आहे. यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, फॉस्फरस, आयोडीन, आयर्न, पोटॅशियम, फोलेट्स, जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व ड, उत्तम फॅट इ. चा समावेश असतो.
दूध म्हणजे अमृत, पहिली लस
बाळाच्या जन्मानंतर आईला येणारे पहिल्या तीन दिवसांतील दूध हे बाळासाठी अमृत मानले जाते. पहिली लसही मानली जाते. हे दूध देऊ नये, असा अनेकांचा गैरसमज आहे. महिनाभरात मानवी दूध बँक म्हणझे लॅक्टेशन मॅनेजमेंट युनिट सुरु होईल. यासाठी रोटरी क्लबचे सहकार्य मिळाले.
- डाॅ. एल. एस. देशमुख, नवजात शिशू विभागप्रमुख, घाटी