भूमिगत केबलिंगसाठी मार्चची डेडलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 06:25 PM2019-01-18T18:25:00+5:302019-01-18T18:25:13+5:30
मागील दीड महिन्यापासून महापालिकेने भूमिगत केबलिंगचे काम अडविले होेते. यासंदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत भूमिगत केबलिंगसाठी खोदलेले रस्ते महावितरणनेच ‘जैसे थे’ करून देण्याच्या मुद्यावर महापालिकेने या कामासाठी ‘ग्रीन सिग्नल’ दिला.
औरंगाबाद : मागील दीड महिन्यापासून महापालिकेने भूमिगत केबलिंगचे काम अडविले होेते. यासंदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत भूमिगत केबलिंगसाठी खोदलेले रस्ते महावितरणनेच ‘जैसे थे’ करून देण्याच्या मुद्यावर महापालिकेने या कामासाठी ‘ग्रीन सिग्नल’ दिला असून, हे काम मार्च २०१९ अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या कंत्राटदारांना सूचना दिल्या आहेत, असे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले.
शहरात एकात्मिक विद्युत विकास कार्यक्रमांतर्गत आॅक्टोबर २०१७ पासून भूमिगत केबलिंगचे काम सुरू झाले आहे. या योजनेंतर्गत एकूण ६५ किलोमीटर भूमिगत केबल व रोहित्रे उभारली जाणार आहेत. दरम्यान, मागील दीड महिन्यापूर्वी संबंधित कंत्राटदाराने जेसीबी यंत्राच्या साहाय्याने रस्ते खोदल्याची तक्रार प्राप्त झाल्यामुळे महापालिकेने हे काम अडविले होते. यासंदर्भात आज शुक्रवारी महावितरणच्या प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया, मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, मनपा उपायुक्त काझी यांच्यात बैठक झाली.
या बैठकीत असे ठरले की, भूमिगत केबलिंगसाठी डांबरी रस्ता खोदला असेल, तर ७५ रुपये प्रति मीटर, सिमेंट रस्ता खोदला असेल, तर १०० रुपये प्रति मीटर आणि पेव्हर ब्लॉक काढले असतील, तर १०० रुपये प्रति मीटर अधिभार महापालिकेला जमा करावा, असे ठरले. याशिवाय एकूण अधिभारावर लेबर चार्जेस म्हणून २० टक्के रक्कम महापालिकेकडे जमा करण्याचा निर्णय झाला. खोदलेला रस्ताही महावितरणनेच ‘जैसे थे’ करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला. त्यामुळे उद्यापासून रखडलेल्या भूमिगत केबलिंगच्या कामाला सुरुवात होईल, असे गणेशकर म्हणाले.