छत्रपती संभाजीनगरात मार्च महिना हॉट; पारा ३८.२ अंशांवर, उष्णता आणखी वाढण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 16:46 IST2025-03-13T16:45:36+5:302025-03-13T16:46:13+5:30
बुधवारने मोडला उच्चांकी तापमानाचा रेकॉर्ड; पारा ३८.२ अंशांवर, किमान तापमानही वाढले

छत्रपती संभाजीनगरात मार्च महिना हॉट; पारा ३८.२ अंशांवर, उष्णता आणखी वाढण्याची शक्यता
छत्रपती संभाजीनगर : शहर व परिसरात १२ मार्च रोजी उच्चांकी तापमानाची नोंद झाली. ३८.२ अंश सेल्सिअसवर कमाल तापमानाचा पारा होता. किमान तापमान २१.४ अंश सेल्सिअसवर होते. यंदाच्या उन्हाळ्यातील हे रेकॉर्डब्रेक तापमान आहे.
तापमान झपाट्याने वाढू लागले आहे. ११ मार्च रोजी ३७.४ अंश सेल्सिअस कमाल, तर २०.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मार्चमधील १२ दिवसांत पाच वेळा उच्चांकी तापमानाची नोंद झाली. दुपारपासून सायंकाळपर्यंत रस्त्यावरची वर्दळ तुरळक होती. यंदाच्या उन्हाळ्यातील हे उच्चांकी तापमान १२ मार्च रोजी नोंदविले गेले. ११ मार्च रोजी ३७.४ अंश सेल्सिअस तापमान होते. मार्चचा पहिला आठवडा उष्णच होता. आता दुसऱ्या आठवड्यातही उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. यंदाच्या मार्च महिन्यात उष्णतेच्या तीव्र लाटा येतील, असे हवामान खात्याने म्हटले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी मार्च महिन्यात उन्हाळा तीव्र असल्याचे जाणवते आहे.
यंदाचा मार्च महिना हॉट
हवामान विभागाच्या रेकॉर्डनुसार १९०१ नंतर २०२२ मधील मार्च महिना सर्वात उष्ण म्हणून नोंदविला गेला. त्यानंतर यंदाचा मार्च महिना उष्ण म्हणून नोंद झाली आहे. येणाऱ्या काळात आणखी उष्णता वाढेल, असे हवामानतज्ज्ञ सांगत आहेत.
तापमान वाढीचे नवे विक्रम होतील
वनसंपदा कमी होणे, काँक्रिटीकरणातून इमारती, सिमेंट रस्त्यांची निर्मिती, वाहनांतून होणारे कार्बन उत्सर्जन यामुळे मार्च महिन्यांत तापमान वाढले आहे. आगामी काळात यापेक्षा जास्त उष्णता जाणवेल. त्यामुळे उष्माघाताचे प्रमाण वाढेल. सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. तापमान वाढीचे नवे विक्रम यंदाच्या उन्हाळ्यात पाहायला मिळतील, अशी शक्यता आहे. १९०१ ते २०२५ पर्यंत या काळात २०२२चा मार्च महिना उष्ण होता. त्यानंतर यंदाचा मार्च उष्ण ठरला आहे.
-प्रा. किरणकुमार जोहरे, हवामान शास्त्रज्ञ
वाढलेले तापमान (अंश सेल्सिअस)
तारीख- कमाल-किमान
३ मार्च- ३७.० -२०.४
८ मार्च- ३७.० -१८.०
९ मार्च- ३७.२ - १८.०
११ मार्च- ३७.४ -२०.८
१२ मार्च- ३७.२- २१.८