शैक्षणिक शुल्क माफीसाठी मार्डची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:04 AM2021-05-29T04:04:51+5:302021-05-29T04:04:51+5:30
औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे मेडिसीन इमारतीसमोर स्थानिक निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ या संघटनेच्या वतीने शैक्षणिक ...
औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे मेडिसीन इमारतीसमोर स्थानिक निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ या संघटनेच्या वतीने शैक्षणिक शुल्क माफीसाठी निदर्शने करण्यात आली. दीड वर्षापासून कोरोनात ड्युटी करतोय. ज्यासाठी वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. त्याचे वर्गच होत नाहीत, तर त्याचे शुल्क का, असा सवाल मार्डने उपस्थित करीत शैक्षणिक शुल्क माफीची मागणी केली.
मध्यवर्ती मार्ड संघटनेचे सचिव डाॅ. आबासाहेब तिडके म्हणाले, दीड वर्षापासून एमडी, एमएसला प्रवेशित विद्यार्थी व त्यांचे गाईड कोरोना ड्युटीत व्यस्त आहेत. ही सेवा करायला नकार नाही. मात्र, यात शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे शैक्षणिक शुक्ल माफ करण्यासाठी यापूर्वी मध्यवर्ती मार्ड संघटनेने डीएमईआरचे संचालक डाॅ. तात्याराव लहाने यांना निवेदन दिले आहे. लवकरच वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची भेट घेऊ.
स्थानिक मार्डचे पदाधिकारी घाटीतील अध्यक्ष डाॅ. अक्षय क्षीरसागर म्हणाले, वैद्यकीय शिक्षणच होत नसल्याचे त्याचे शुल्क विद्यार्थ्यांनी का भरावे. ते शासनाने माफ करावे, यासाठी ही निदर्शने करण्यात आली. तसेच कोरोनात काम करणाऱ्या कनिष्ठ निवासी डाॅक्टरांनी विमा संरक्षण नाही. त्यामुळे ते विमा संरक्षण आम्हाला देण्यात यावे, अशी मागणी शासनाकडे आहे. डाॅ. उमेश येवले, डाॅ. योगिता देवरे, डाॅ. ऋषिकेश गव्हाणे, डाॅ. ऋषिकेश फडणीस, डाॅ. साैरव डिकोळे, आदींची यावेळी उपस्थिती होती.
--
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (घाटी) विद्यार्थी
---
अभ्यासक्र : शैक्षणिक शुल्क प्रति विद्यार्थी : विद्यार्थी संख्या
प्रथम वर्ष एमबीबीएस - १ लाख ५ हजार १० रु. -२००
द्वितीय वर्ष एमबीबीएस - ९७ हजार - २००
मायनर वर्ष एमबीबीएस - ८८ हजार -१५०
मेजर वर्ष एमबीबीएस - ८९ हजार ५०० -१५०
कनिष्ठ निवासी (जेआर १) - १ लाख ८ हजार ६०० -१६६
कनिष्ठ निवासी (जेआर २)-९८ हजार -१४०
कनिष्ठ निवासी (जेआर ३)- ८९ हजार २०० -१४५
---