विवाहितेचा मृत्यू; सासूला अटक
By Admin | Published: July 15, 2014 12:08 AM2014-07-15T00:08:49+5:302014-07-15T00:57:31+5:30
हिंगोली : तालुक्यातील बेलोरा येथे विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या ६ जणांपैकी दोन आरोपींना अटक केल्यानंतर रविवारी मयताच्या सासुला अटक झाली.
हिंगोली : तालुक्यातील बेलोरा येथे विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या ६ जणांपैकी दोन आरोपींना अटक केल्यानंतर रविवारी मयताच्या सासुला अटक झाली. इतर तीन आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक पाठविण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिलीप ठोंबळ यांनी दिली.
बेलोरा येथील गोदावरी प्रकाश नागरे (वय २३) हिने ४ जुलै रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याने नांदेड येथे उपचार सुरू असताना शुक्रवारी तिचा मृत्यू झाला.
या प्रकरणी विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्यावरून सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत श्रीराम निवृत्ती कुटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी प्रकाश किशन नागरे, किसन नागरे, लक्ष्मीबाई किसन नागरे (तिघे रा. बेलोरा गुठ्ठे), सुनीता बाळू घुगे (रा. कोथळज), संगीता कुंडलिक कुटे (रा. दौडगाव), रंभाबाई नागोराव जायभाये (रा. गोजेगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहेराहून ५० हजार रुपये व दागिने आणण्यासाठी सासरी दोन वर्षापासून सदर विवाहितेचा छळ होत असल्याने तिने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद केलेले आहे. यातील आरोपी प्रकाश नागरे, किसन नागरे, यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, रविवारी आरोपी लक्ष्मीबाई नागरे हिला पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता तिला न्यायालयीन कोठडी मिळाल्याचे पोनि ठोंबळ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
आणखी तिघांचा शोध सुरू
हिंगोली तालुक्यातील बेलुरा येथे ४ जुलै रोजी सासरच्या जाचास कंटाळून विवाहितेने राहत्या घरी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले होते.
गंभीररित्या भाजलेल्या विवाहितेचा नांदेड येथे उपचारादरम्यान झाला होता मृत्यू.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहा जणांविरूद्ध हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झाला होता गुन्हा.
दोन आरोपींना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयाने सुनावली पोलिस कोठडी.