रिटेलमध्ये १०० टक्के विदेशी गुंतवणुकीच्या विरोधात शुक्रवारी बाजारपेठ बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 02:08 PM2018-09-26T14:08:14+5:302018-09-26T14:08:43+5:30
केंद्र सरकारने रिटेलमध्ये १०० टक्के विदेशी गुंतवणुकीला परवानगी दिल्याच्या निषेधार्थ जिल्हा व्यापारी महासंघाने २८ सप्टेंबर रोजी बाजारपेठ बंदचा निर्णय घेतला आहे.
औरंगाबाद : केंद्र सरकारने रिटेलमध्ये १०० टक्के विदेशी गुंतवणुकीला परवानगी दिल्याच्या निषेधार्थ जिल्हा व्यापारी महासंघाने २८ सप्टेंबर रोजी बाजारपेठ बंदचा निर्णय घेतला आहे.
पत्रपरिषदेत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सांगितले की, रिटेलमध्ये १०० टक्के विदेशी गुंतवणूक व आॅनलाईन विक्रीच्या विरोधात कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स (कॅट)ने देशव्यापी बाजारपेठ बंदची घोषणा केली आहे. यास जिल्हा व्यापारी महासंघ, त्याअंतर्गत येणाऱ्या ७२ व्यापारी संघटना, मराठवाडा चेंबर आॅफ कॉमर्सने पाठिंबा दर्शविला आहे. बंद यशस्वीतेसाठी सर्व तालुक्यांतील व्यापारी संघटनांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. संपूर्ण देशभरातील ७ कोटी व्यापारी व त्यांच्यावर आधारित ४० कोटी नोकर, कर्मचारी बंदमध्ये सहभागी होत आहेत. यावेळी माजी अध्यक्ष आदेशपालसिंग छाबडा, अजय शहा लक्ष्मीनारायण राठी, सरदार हरिसिंग, दीपक पहाडे, अजय जैस्वाल, युसूफ चौधरी, जयंत देवळाणकर, गुलाम हक्कानी, कचरू वेळंजकर, तनसुख झांबड, राकेश सोनी आदी हजर होते.
वाहन रॅली, धरणे आंदोलन
जिल्हा व्यापारी महासंघातर्फे जनजागृतीसाठी २७ रोजी वाहन रॅली काढण्यात येणार आहे, तसेच २८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी ३ वाजता धरणे धरण्यात येणार आहे.