बाजार समितीत ६० हजार क्विंटल माल पडून
By Admin | Published: May 7, 2017 12:08 AM2017-05-07T00:08:50+5:302017-05-07T00:09:28+5:30
लातूर : आडते आणि हमालाच्या वादात जिल्हाभरातील तब्बल ६० हजार क्विंटल शेतमाल गेल्या पाच दिवसांपासून जाग्यावर पडून आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आडत व्यापाऱ्याकडून मिळणारी मजुरी अत्यल्प असून या मजुरीत ५० टक्क्यांनी वाढ करावी, या प्रमुख मागणीसाठी हमाल, मापाडी, गाडीवान संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन पुकारण्यात आलेल्या संपाचा पाचवा दिवसही कडकडीत बंदचा गेला़ या आंदोलनात हमाल, मापाडी, गाडीवान, महिला कामगारांसह तीन हजार हमालांनी पाचव्या दिवशीही पोत्याला हात लावला नाही़ या आंदोलनामुळे लातूर बाजार समितीतील आडत्यांची दुकाने मालाच्या पोत्याने खचाखच भरली आहेतच़ शिवाय, बाजार समितीचे रस्ते आणि प्रांगणही मालाच्या पोत्यांनी जाम झाले आहेत़ त्यात अवकाळी पावसाचा इशारा मिळाल्याने तिकडे शेतकरी हवालदिल झाला असून, आडते आणि हमालाच्या वादात जिल्हाभरातील तब्बल ६० हजार क्विंटल शेतमाल गेल्या पाच दिवसांपासून जाग्यावर पडून आहे़
गेल्या पाच दिवसात बाजार समिती आणि सहायक कामगार आयुक्तांनी आडत व्यापारी आणि हमाल संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या चार बैठका घेतल्या़ मात्र याबाबत शनिवारी कुठलाही मार्ग निघाला नाही़ त्यामुळे चारही बैठका निष्फळ ठरल्या आहेत़ हमालांच्या संपाचा शनिवारी पाचवा दिवस होता़ परिणामी, या संपामुळे बाजार समितीत ५० ते ६० हजार क्विंटल शेतमाल जाग्यावर पडून आहे़ यातून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे़ तसेच कोट्यवधींची उलाढाला ठप्प आहे़ लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण १ हजार ५०० आडत व्यापाऱ्यांची नोंदणीकृत दुकाने आहेत़ त्यापैकी ७५० दुकाने सुरू आहेत़ या आडतीवर हमाला, मापाडी, गाडीवान आणि महिला कामगार असे एकूण तीन हजार हमाल काम करतात़ गेल्या अनेक दिवसांपासून हमालीचे दर वाढून मिळावेत, यासाठी या कामगारांचा संघर्ष सुरू आहे़ प्रत्येक वेळी आश्वासन देवून संप मिटविण्याचा प्रयत्न केला जातो़ मात्र दिलेल्या आश्वासनांची पूर्तता संबंधित व्यापाऱ्यांकडून होत नसल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे़ सध्या मिळणारी प्रतिक्विंटल हमाली १० रूपये आहे़ ती १५ रूपये करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी कामगार संघटनेची आहे़ याच मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून हा संप सुरू आहे़
लातूरच्या बाजार समितीत १९०० कामगार हे परवानाधारक आहेत़ या कामगारांसह इतर कामगारांची संख्या एकूण तीन हजारांच्या घरात आहे़ २०११ मध्ये हमालीच्या मजुरीत दरवाढ करण्यात आली होती़ तेव्हापासून अद्याप दरवाढ करण्यात आली नाही़ वाढत्या महागाईबरोबर ही दरवाढ होणे अपेक्षित आहे़ मात्र व्यापाऱ्याकडून दुष्काळाचे कारण सांगत गेल्या तीन वर्षांपासून दरवाढ करण्यात आली नाही़ त्यामुळे कामगारांनी पुन्हा काम बंद आंदोलन केले आहे़ परिणामी बाजार समितीतील व्यवहार ठप्प आहेत़