बाजार समिती वाऱ्यावर
By Admin | Published: February 3, 2017 12:33 AM2017-02-03T00:33:28+5:302017-02-03T00:36:38+5:30
बीड शहरापासून २-३ कि.मी. अंतरावर असलेल्या कृउबाचा कारभारदेखील वाऱ्यावरच आहे.
राजेश खराडे बीड
शहरापासून २-३ कि.मी. अंतरावर असलेल्या कृउबाचा कारभारदेखील वाऱ्यावरच आहे. ऐन सकाळच्या प्रहरीच कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांची गैरहजेरी असते. सध्या सुगीचे दिवस सुरू असल्याने शेतकऱ्यांची गर्दी होत असतानाच अधिकाऱ्यांनी कारभार वाऱ्यावर सोडल्याने गैरसोय होत असल्याचे ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आले.
शेती मालाची खरेदी-विक्री, होणारी आवक व दर ठरविण्यासाठी केले जाणारे लिलाव यासारख्या महत्त्वपूर्ण बाबी कृउबामध्ये होतात. याकरिता १०० ते १५० खाजगी व्यापारी कृउबामध्ये असून, यावर अंकुश बसवून शेतकऱ्यांचे हित जोपासण्याची जबाबदारी येथील अधिकाऱ्यांवर आहे. मात्र, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे कृउबामध्ये अवमेळ असल्याचे दिसून येत आहे. ३० अधिकारी, कर्मचारी कार्यरत असताना केवळ बोटावर मोजण्याएवढ्याच अधिकाऱ्यांची उपस्थिती असते. दुपारनंतर तर कृउबामध्ये शुकशुकाटच असतो.
काळाच्या ओघात सर्व कार्यालयांमध्ये अत्याधुनिक प्रणालीचा अवलंब केला जात असला तरी येथील कृउबामध्ये बायोमेट्रिक यंत्रदेखील बसविण्यात आलेले नाही. आजही रजिस्टरवरच हस्ताक्षराद्वारे हजेरी होत आहे. शिवाय, कार्यालयाच्या इमारतीचे कोपरे पान-तंबाखूच्या पिचकारीने रंगलेले दिसून येतात.