बाजारपेठेत उत्साह; दैनंदिन व्यवहार सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:02 AM2021-08-17T04:02:06+5:302021-08-17T04:02:06+5:30

औरंगाबाद : कोरोना प्रादुर्भावात गेल्या १७ महिन्यांपासून आर्थिक संकटाला सामोरे जाणाऱ्या व्यापारी, व्यावसायिकांना स्वातंत्र्य दिनापासून निर्बंधमुक्तीने मोठा दिलासा मिळाला. ...

Market excitement; Daily transactions smoothly | बाजारपेठेत उत्साह; दैनंदिन व्यवहार सुरळीत

बाजारपेठेत उत्साह; दैनंदिन व्यवहार सुरळीत

googlenewsNext

औरंगाबाद : कोरोना प्रादुर्भावात गेल्या १७ महिन्यांपासून आर्थिक संकटाला सामोरे जाणाऱ्या व्यापारी, व्यावसायिकांना स्वातंत्र्य दिनापासून निर्बंधमुक्तीने मोठा दिलासा मिळाला. संपूर्ण आठवडा रात्री १० वाजेपर्यंत व्यवसायाची मुभा मिळाल्याने बाजारपेठेत उत्साह पहायला मिळत आहे. दैनंदिन व्यवहार सुरळीत झाल्याने विस्कटलेली आर्थिक घडी लवकरच पूर्वपदावर येण्याची आशा व्यापारी, व्यावसायिकांनी व्यक्त केली.

निर्बंधमुक्तीचा पहिलाच दिवस आणि स्वातंत्र्य दिनाची सुटी, असा दुहेरी योग साधत पहिल्याच दिवशी रविवारी अनेकांनी खरेदीचा आणि हाॅटेल्समध्ये कुटुंबासह जेवणाचा आनंद घेतला. शहरातील खुल्या रेस्टाॅरंट, हाॅटेल्सला पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद मिळाला. त्यातुलनेत बंदिस्त हाॅटेल्स, रेस्टाॅरंटला कमी प्रतिसाद राहिला. मात्र आगामी काळात त्याला प्रतिसाद वाढेल, अशी आशा हाॅटेल व्यावसायिकांनी व्यक्त केली. निर्बंधमुक्तीमुळे रात्री १० वाजेपर्यंत बाजारपेठेत गर्दी पहायला मिळत आहे.

लसीकरण प्रमाणपत्र पाहूनच माॅलमध्ये प्रवेश

माॅलमध्ये प्रवेश करण्यासाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा घेऊन १४ दिवस पूर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे लसीकरणाचे प्रमाणपत्र पाहूनच ग्राहकांना माॅलमध्ये प्रवेश देण्यावर भर दिला जात आहे.

ग्राहकांचा चांगला प्रतिसाद

अनेक दिवस पाठपुरावा केला आणि त्यास यश आले. रात्री १० वाजेपर्यंतची वेळ मिळाली. पहिल्या दिवशी खुल्या रेस्टाॅरंट, हाॅटेल्सला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पूर्वी दुपारी ४ वाजेपर्यंतची वेळ होती, मात्र यावेळेत कोणी जेवण्यासाठी येत नव्हते. आता यापुढे ग्राहकांचा प्रतिसाद वाढेल.

- शिवाजी पाटील, अध्यक्ष, औरंगाबाद डिस्ट्रिक्ट हाॅटेल्स रेस्टाॅरंट ओनर्स असोसिएशन

व्यवहार पूर्वपदावर

शासनाने घेतलेल्या निर्णयाचे व्यापारी महासंघ स्वागत करीत आहे. या निर्णयामुळे व्यापार पूर्वपदावर येण्यास मदत होत आहे. आगामी आठवडाभरात पूर्वीप्रमाणे व्यवहार सुरळीत होतील, असा विश्वास आहे. व्यापाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन आहे.

- जगन्नाथ काळे, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ

Web Title: Market excitement; Daily transactions smoothly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.