बाजारपेठेने पांघरली निळाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 11:42 PM2019-04-13T23:42:06+5:302019-04-13T23:42:29+5:30
बाजारपेठेत जिकडे पाहावे तिकडे निळे झेंडे, निळे पताके, निळे फेटे, निळे दुपट्टे, निळे आकाशकंदिल आणि त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची छायाचित्रे दिसत आहेत. जणू संपूर्ण बाजारपेठेनेच निळाई पांघरली आहे. आंबेडकर जयंतीच्या आदल्या दिवशी विविध वस्तू खरेदीसाठी अनुयायांनी बाजारपेठेत गर्दी केली होती.
औरंगाबाद : बाजारपेठेत जिकडे पाहावे तिकडे निळे झेंडे, निळे पताके, निळे फेटे, निळे दुपट्टे, निळे आकाशकंदिल आणि त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची छायाचित्रे दिसत आहेत. जणू संपूर्ण बाजारपेठेनेच निळाई पांघरली आहे. आंबेडकर जयंतीच्या आदल्या दिवशी विविध वस्तू खरेदीसाठी अनुयायांनी बाजारपेठेत गर्दी केली होती.
भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रविवारी (दि.१४ एप्रिल) साजरी होेत आहे. या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात सजावटीचे विविध साहित्य विक्रीसाठी आले आहे. यात सर्वाधिक निळे झेंडे आहेत. पूर्वी मछली खडक, सिटी चौकातील बोटावर मोजण्याइतक्याच दुकानांत निळे झेंडे दिसत असत. मात्र, आता सिडको, हडको, टीव्ही सेंटर, आंबेडकरनगर, मुकुंदवाडी, चिकलठाणा, रमानगर, जवाहर कॉलनी, पुंडलिकनगर, शिवाजीनगर, रेल्वेस्टेशन परिसर, छावणी, बेगमपुरा, औरंगपुरा, पैठणगेट, क्रांतीचौक, पद्मपुरा अशा सर्व परिसरात अनेक स्टॉलवर निळे झेंडे विकले जात आहेत. पाव मीटरपासून ते ५ मीटरपर्यंतचे भव्य झेंडे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. या झेंड्यावर अशोक चक्र आहेच, शिवाय यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चित्रही बहुतांश झेंड्यांवर दिसते आहे. अनेक झेंड्यांवर ‘कलम का बादशहा’, ‘जय भीम’ ,‘ एकच साहेब बाबासाहेब’ असे प्रिंट करण्यात आले आहे. वाहनांवर, घरावर लावण्यासाठी तर कोणी कार्यक्रमाच्या स्थळी लावण्यासाठी झेंडे खरेदी करीत होते. सर्वत्र खरेदीत अपूर्व उत्साह दिसून आला, याशिवाय पंचशील ध्वजही मोठ्या संख्येने विक्री होताना दिसले. सजावटीच्या साहित्यात निळे पताके, निळी चमकी आहेच, शिवाय निळे दुपट्टे, निळ्या रंगाच्या टोप्या ज्यावर दोन्ही बाजूने ‘जय भीम’ प्रिंट केलेले आहे. अशा टोप्यांना तरुणवर्गात अधिक मागणी दिसून आली. मागील आठ दिवसांत लाखो रुपयांचा व्यवसाय झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
यंदा
नावीन्यपूर्ण आकाशकंदिल, फेट्यांचे आकर्षण
मागील दोन वर्षांपासून डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त निळ्या रंगाचे आकाशकंदिल विक्रीला येत आहेत. यंदा या आकाशकंदिलामध्ये विविधता, नावीन्यता पाहण्यास मिळत आहे. तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र, तसेच अशोक चक्र प्रिंट केलेले आकाशकंदिल हातोहात विक्री होत आहेत.
यंदा पहिल्यांदाच निळ्या रंगातील फेटे विक्रीला आले आहेत. रेडिमेड फेट्यांची किंमत १०० ते १२० रुपयांदरम्यान आहे.