गरम कपड्यांचा बाजार आणखी चालणार
By Admin | Published: January 2, 2015 12:42 AM2015-01-02T00:42:13+5:302015-01-02T00:52:02+5:30
औरंगाबाद : अवकाळी पावसाने थंडीसोबतच तिबेटियन बांधवांचा मुक्काम काही दिवस वाढविला आहे. मात्र, वर्षाच्या पहिल्या दिवशी गरम कपड्यांचा बाजार ‘थंड’ राहिला.
औरंगाबाद : अवकाळी पावसाने थंडीसोबतच तिबेटियन बांधवांचा मुक्काम काही दिवस वाढविला आहे. मात्र, वर्षाच्या पहिल्या दिवशी गरम कपड्यांचा बाजार ‘थंड’ राहिला. या हंगामात ६५ टक्के स्वेटर्स, जॉकीट विक्री झाले असून, थंडी वाढल्यास उर्वरित मालही विक्री होईल, अशी अशा तिबेटियन बांधवांना वाटत आहे.
औरंगाबादेत तिबेटियन शरणार्थी स्वेटर्स विक्रेत्यांची दुकाने लागली की, हिवाळ्याला सुरुवात झाली असे समीकरणच मागील ३५ वर्षांपासून बनले आहे. मध्यवर्ती बसस्थानकाच्या बाजूला असलेल्या कापड मिलच्या जागेवर १० आॅक्टोबर रोजी तिबेटियन मार्केट थाटले. डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात पारा ७. ८ सेल्सिअसपर्यंत खाली घसरल्याने स्वेटर्स, जॉकीटची विक्री चांगली झाली.
३१ डिसेंबरच्या मध्यरात्री अवकाळी पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. गुरुवारी नववर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी ९ वाजेपर्यंत पाऊस सुरूहोता. नंतर दिवसभर ढगाळ वातावरण राहिले सायंकाळी ५ वाजून १२ मिनिटांनी पुन्हा पावसास सुरुवात झाली. अवकाळी पावसाने थंडीचा मुक्काम वाढविला आहे. पण आज गरम कपडे खरेदीसाठी ग्राहक फिरकले नाही.
यासंदर्भात स्वेटर्स विक्रेता एस. डी. छोफेल यांनी सांगितले की, जेव्हा डिसेंबर-जानेवारी महिन्यात अवकाळी पाऊस पडतो, त्यावेळी एक ते दोन आठवडे हिवाळा पुढे सरकतो. पूर्वी आमचा हंगाम डिसेंबर महिन्यात संपत असे. मात्र, मागील काही वर्षांपासून आमचा मुक्काम जानेवारीच्या अखेरच्या तारखेपर्यंत वाढला आहे. यंदाही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. ६५ टक्के स्वेटर्स विक्री झाले असून, थंडीचा मुक्काम वाढल्यास उर्वरित मालही विक्री होईल.