जीएसटी विरोधात बाजारपेठ कडकडीत बंद; मोंढ्यातील सर्व व्यवहार थांबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 08:33 PM2021-02-26T20:33:04+5:302021-02-26T20:37:29+5:30
Market Bandha against GST व्यापाऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कॉन्फिडेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेंडर्सने देशव्यापी बंदच्या दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत औरंगाबादमध्ये व्यापाऱ्यांनी शुक्रवारी आपली दुकाने उत्स्फूर्त बंद ठेवली.
औरंगाबाद : जीएसटीतील जाचक नियम रद्द करा, यांसह अन्य मागण्यांसाठी जिल्हा व्यापारी महासंघाने पुकारलेला बंद कडकडीत पाळण्यात आला. मुख्य बाजापरेठेसह जुना आणि नवा मोंढा शंभर टक्के बंद राहिला. शहरात दिवसभरात २५० ते ३०० कोटींची उलाढाल ठप्प राहिल्याचा दावा व्यापारी महासंघाने केला आहे.
व्यापाऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कॉन्फिडेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेंडर्सने देशव्यापी बंदच्या दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत औरंगाबादमध्ये व्यापाऱ्यांनी शुक्रवारी आपली दुकाने उत्स्फूर्त बंद ठेवली. जुन्या बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला; पण अन्य भागात संमिश्र प्रतिसाद मिळाला. दिवसभरात सुमारे ३०० कोटींची उलाढाल ठप्प राहिल्याचा दावा जिल्हा व्यापारी महासंघाने केला. एक देश एक करप्रणाली पूर्णपणे अमलात आणावी, जीएसटीशिवाय अन्य कर व उपकर रद्द करण्यात यावेत, जीएसटीतील जाचक नियम रद्द करण्यात यावे, महानगरपालिकेने व्यापाऱ्यांवर लादलेला परवाना शुल्क रद्द करण्यात यावा, आदी मागण्यांसाठी एक दिवसाचा बंद पुकारण्यात आला होता. याला शहरातील व्यापाऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. औषधी, दूध, काही हॉटेल्स आणि खाद्यपदार्थांची दुकाने मात्र सुरू होती. व्यापारी महासंघ, कापड व्यापारी संघटना, टिळकपथ- पैठणगेट व्यापारी संघटनेचे पदाधिकारी शहरात फिरून दुकाने बंद करण्याचे आवाहन करत होते. त्यांच्या आवाहनला त्या भागातील व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सांगितले की, व्यापाऱ्यांनी बंद पुकारल्याने औरंगाबाद शहरातील २५० ते ३०० कोटींची दैनंदिन व्यवहार ठप्प झाले होते. मराठवाडा चेंबरचे अध्यक्ष प्रफुल्ल मालानी यांनी सांगितले की, मराठवाड्यात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. ८ जिल्ह्यात मिळून २ हजार कोटींची उलाढाल ठप्प राहिली.