बाजारपेठा थंड
By Admin | Published: November 24, 2014 12:09 AM2014-11-24T00:09:45+5:302014-11-24T00:36:42+5:30
व्यंकटेश वैष्णव, बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे आठवडी बाजारांमध्ये देखील शुकशुकाट जाणवू लागला आहे.
व्यंकटेश वैष्णव, बीड
जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे आठवडी बाजारांमध्ये देखील शुकशुकाट जाणवू लागला आहे. याचा परिणाम छोट-छोट्या व्यापाऱ्यांच्या विक्रीवर होत असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.
आठवडी बाजारावर ग्रामीण भागातील अर्थशास्त्र आवलंबून असते. मजूरांना आठवडाभर केलेल्या कामाचा पैसा आठवडी बाजारातच वाटप करण्याची पध्दत ठिकठिकाणी आहे. मात्र सध्या बळीराजाच दुष्काळी स्थितीचा सामना करत असल्याने मजूरांच्या हाताला नियमित काम नाही. यामुळे आठवडी बाजारात पैसा फिरेलच याचा नेम राहिला नाही. परिणामी बाजारात आलेल्या व्यापाऱ्यांच्या मालांची विक्री मंदावली असल्याचे आठवडी बाजारात कपडे विक्री करणारे व्यापारी दिनकर राऊत यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
रविवारी हीच स्थिती बीड येथील आठवडी बाजारात आला. तर बुधवारी वडवणी येथील बाजारात गर्दी कमी झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. अगोदरच यंदा बीड जिल्ह्यातून सहा लाख ऊसतोड कामगार बाहेर राज्यात व जिल्ह्यात ऊस तोडण्यासाठी गेलेले आहेत. यातच दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने आठवडी बाजारात व्यापाऱ्यांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे.
व्यापाऱ्यांचाही जीव भांड्यात
आठवडी बाजारात ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो म्हणून तेल विक्रेते, कपडे विक्रेते, फळ विक्रेते, भांडे, कटलरी विक्रेते, सोने-चांदीचे व्यापारी आदींनी मोठ्या प्रमाणात माल खरेदी करून ठेवला आहे. मात्र बळीराजाचेच दुष्काळामुळे अर्थशास्त्र कोलमडले असल्याने आठवडी बाजार थंडावले आहेत. यामुळे व्यापाऱ्यांचे देखील मोठे नुकसान होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
दुष्काळी झळांमुळे लग्नसराई लांबण्याची शक्यता आहे.
४छोट्या व्यावसायिकांसह मोठे व्यावसायिकही अडचणीत आले आहेत.
४बाजारपेठेमध्ये शुकशुकाट पहावयास मिळत आहे.