पंढरपूरमध्ये अतिक्रमणे हटविण्यासाठी मार्किंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 11:58 PM2019-05-20T23:58:38+5:302019-05-20T23:58:38+5:30
हदारीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविण्यासाठी पथकर वसूल करणाऱ्या के.टी.संगमतर्फे खुना करण्यात येत आहेत.
वाळूज महानगर : औरंगाबाद-नगर महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. वाहतूक कोंडीमुळे सारख्या अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे रहदारीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविण्यासाठी पथकर वसूल करणाऱ्या के.टी.संगमतर्फे खुना करण्यात येत आहेत. सोमवारी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पंढरपुरात रस्त्याच्या दुतर्फा मार्किंग करुन रस्त्याची हद्द निश्चित केली.
जागतिक बँक प्रकल्पाच्या अखत्यारित असलेल्या औरंगाबाद-नगर या महामार्गाचे दशकभरापूर्वी बीओटी तत्वावर रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात आले होते. के.टी.संगम या कंपनीमार्फत वाहनधारकांकडून पथकर वसुली केले जात आहे. विशेष म्हणजे या महामार्गाची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी के.टी.संगमकडे आहे. गोलवाडी फाट्यापासून ढोरेगावपर्यत या रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणे झालेली आहेत. विशेष म्हणजे या रस्त्याच्या कडेलाच जडवाहने थांबत असल्याने इतर वाहनधारकांची गैरसोय होत आहे. यासंदर्भात दहेगाव बंगला येथील नागरिकांनी के.टी.संगम कंपनी तसेच वाळूज वाहतूक शाखेकडे अतिक्रमणे हटविण्याची मागणी केली होती.
ढोरेगावपासून पंढरपूरपर्यंत ठिकठिकाणी पानटपरी, हॉटेलचालक आदी छोट्या विक्रेत्यांनी अतिक्रमणे केले आहे. या शिवाय बड्या व्यवसायिकांनी पार्किंगसाठी जागाच न सोडल्याने ग्राहक रस्त्यावर वाहने उभी करतात. अतिक्रमण व रस्त्यावरील वाहनांमुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे के.टी.संगम तर्फे पंढरपूरात सोमवारी दुभाजकापासून अंतर मोजुन दोन्ही बाजूने अतिक्रमणे असलेल्या इमारती व दुकानांवर मार्किंग करुन खुना करण्यात आल्या आहेत. रहदारीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविण्याच्या सूचनाही या अतिक्रमणधारकांना देण्यात आल्याची माहिती के. टी.संगमच्या अधिकाºयांनी दिली.