२५ लाखांसाठी विवाहितेचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 10:53 PM2019-03-23T22:53:52+5:302019-03-23T22:54:02+5:30
कंपनी टाकण्यासाठी माहेरवरुन २५ लाख रुपये आण असे म्हणून ३० वर्षीय विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या आठ जणाविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाळूज महानगर : कंपनी टाकण्यासाठी माहेरवरुन २५ लाख रुपये आण असे म्हणून ३० वर्षीय विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या आठ जणाविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रुती अक्षय चंद्रस (३०, रा. ह.मु. स्वप्ननगरी हौ. सोसायटी बजाजनगर) असे विवाहितेचे नाव आहे. तिचे २० एप्रिल २०१८ रोजी अक्षय वासुदेव चंद्रस याच्याशी लग्न झाले. लग्नानंतर काही दिवसांनंतरच नाशिक येथे कंपनी सुरु करण्यासाठी आई-वडिलांकडून २५ लाख रुपये घेवून ये म्हणून तिचा छळ सुरु केला. सततच्या त्रासामुळे श्रुतीची प्रकृती बिघडल्याने ती माहेरी आली. हा प्रकार तिने आई-वडिलांना सांगितला. तिच्या आई-वडिलांनी लग्नात मध्यस्थी करणारे शैलेश कोराणे, श्रुती कोराणे व कृष्णा चंद्रस यांना हा प्रकार सांगितला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. १३ नोव्हेंबर २०१८ रोजी श्रुतीचे आई, वडिल व भाऊ नाशिक येथे याविषयी चर्चेसाठी गेले असता त्यांच्यात शाब्दीक वाद झाला. त्यावेळी संदीप जोशी याने तुम्हाला नाशिकच्या बाहेर जावू देणार नाही, अशी धमकी दिली.
याविषयी नाशिक उपनगर पोलीस ठाण्यात तक्रारही दिली. त्यामुळे अक्षय व सासरच्या मंडळींनी श्रुतीकडे फारकतीची मागणी करुन नांदविण्यास स्पष्ट नकार दिला. या प्रकरणी श्रुती चंद्रस हिच्या तक्रारीवरुन वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात पती अक्षय सह सासरा वासूदेव चंद्रस, सासू गीता चंद्रस, नणंद आरती चंद्रस, मावस सासरा शैलेश कोराणे, मावस सासू श्रुती कोराणे, चुलत सासरा कृष्णा चंद्रस व संदीप जोशी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.