भांगसीमाता गडावरून ढकलून विवाहितेचा खून
By Admin | Published: June 18, 2017 12:51 AM2017-06-18T00:51:52+5:302017-06-18T00:58:02+5:30
दौलताबाद : भांगसीमाता गडावरुन पडल्याने एका विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली
लोकमत न्यूज नेटवर्क
दौलताबाद : भांगसीमाता गडावरुन पडल्याने एका विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. दरम्यान, पती व दिरानेच तिला ढकलून देऊन मारल्याची तक्रार मयत विवाहितेच्या वडिलांनी पोलिसात दिल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी सांगितले की, माळीवाडा येथील शीतल रामनाथ फटांगळे (२२) ही शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पती रामनाथसोबत भांगसीमाता गडावर दर्शनासाठी गेली होती. गडावरुन रामनाथने शीतलचे वडील हरिदास सखाराम बनसोड यांना फोन केला व तुमची मुलगी गडावरुन पडल्याचे सांगितले. यानंतर रामनाथचा भाऊ लक्ष्मणनेही फोन करुन ही माहिती हरिदास यांना दिली. प्रत्यक्षात या भावंडांनीच तिला गडावरुन ढकलून तिचा खून केल्याचे निष्पन्न झाले.
शीतलचे लग्न ३० एप्रिल २०१६ रोजी माळीवाडा येथील रामनाथ दत्तू फटांगळे याच्यासोबत झाले होते. विवाहानंतर सहा महिन्यातच रामनाथ तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करीत होता.
तू मला आवडत नाही म्हणून रामनाथने शीतलला माहेरी आणून सोडले होते. त्यानंतर शीतलच्या वडिलांनी समजूत काढून मुलीस नांदण्यास पाठविले होते. रामनाथ व त्याचा भाऊ लक्ष्मण यांनीच शीतलला गडावर नेऊन तिचा खून केला, अशी तक्रार हरिदास बनसोडे (रा. सोबलगाव, ता. खुलताबाद) यांनी दौलताबाद पोलीस ठाण्यात दिल्याने पोलिसांनी रामनाथ व लक्ष्मण या भावांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे, पोलीस उपनिरीक्षक संजय मांटे करीत आहेत. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. माळीवाळा येथे पोलीस बंदोबस्तात शीतलवर अंत्यसंस्कार करण्यात आले.