चार दिवसांवर मुलांवर लग्न, अपघातात आई-वडील जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:02 AM2021-04-03T04:02:56+5:302021-04-03T04:02:56+5:30
परसोडा : मुंबई- नागपूर महामार्गावर करोडी फाट्याजवळील उड्डाणपुलाजवळ एका ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील पती-पत्नी जागीच ठार झाले. ...
परसोडा : मुंबई- नागपूर महामार्गावर करोडी फाट्याजवळील उड्डाणपुलाजवळ एका ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील पती-पत्नी जागीच ठार झाले. हा अपघात शुक्रवारी सकाळी १० वाजेदरम्यान घडला. अपघातातील मृतात परसोडा येथील संजय पूनमचंद छानवाल (५२) व मीनाबाई संजय छानवाल (४८) यांचा समावेश आहे. चार दिवसांवर मुलाचे लग्न असल्याने हे दाम्पत्य नातेवाईकांकडे लग्नपत्रिका घेऊन जात होते.
परसोडा येथील गरीब शेतकरी दाम्पत्य संजय छानवाल हे त्यांची पत्नी मीनाबाई छानवाल यांच्यासह राजावाडी या सासुरवाडीला जाण्यासाठी शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता दुचाकी(क्र. एम. एच. २० डी. एक्स. ३१७९)ने घरून निघाले. मुंबई- नागपूर महामार्गावर करोडी फाट्याजवळील उड्डाणपुलाजवळ सकाळी १० वाजेच्या दरम्यान एका भरधाव ट्रक(क्र.जी.जे.०३ बी.डब्लू. २७८६)ने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात पत्नी-पत्नी जागीच ठार झाले. अपघात इतका भयानक होता की, दोघांच्याही शरीराचा अक्षरश: चुराडा झाला होता. रस्त्यावर हाडामांसांचे तुकडे पसरले होते. अपघाताची माहिती मिळताच दौलताबाद पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक राजश्री आडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात पाठविले. या अपघाताची नोंद दौलताबाद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या अपघाताने छानवाल कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुदाममसिंग छानवाल, उपसरपंच राजू छानवाल यांनी घाटी रुग्णालयात जाऊन दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन गावी आणले. सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
चौकट
निमंत्रण देण्यासाठी चालले होते सासुरवाडीला
संजय छानवाल हे परसोडा येथील गरीब अल्पभूधारक शेतकरी होते. स्वत:च्या शेतात काम करुन ते दुसऱ्याच्या शेतावर राेजमजुरी करुन संसाराचा गाडा हाकत हाेते. त्यांना दोन मुले असून एका मुलाचे लग्न झाले आहे. तर दुसऱ्या मुलाचे लग्न चार दिवसानंतर म्हणजे ७ एप्रिल रोजी होते. मुलाच्या लग्नाचे पहिले निमंत्रण हे सासुरवाडीला देण्यासाठी दोघेही पती-पत्नी शुक्रवारी औरंगाबादजवळील राजावाडी येथे निघाले होते. मात्र, मध्येच काळाने घाला घालून त्यांना हिरावून नेले. दुसऱ्या मुलाचा लग्नसोहळाही त्यांना पाहता आला नाही. यामुळे परसोडा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
फोटो :