जिन्सी येथे दवाखान्यात प्रसूतीदरम्यान विवाहिता दगावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 11:36 PM2018-12-25T23:36:14+5:302018-12-25T23:37:28+5:30
गरोदर महिला प्रसूतीसाठी सिटीजन्स रुग्णालयात दाखल झाली. तिने गोंडस बाळाला जन्मही दिला व त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत महिलेचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाइकांनी रुग्णालयात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. जिन्सी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
औरंगाबाद : गरोदर महिला प्रसूतीसाठी सिटीजन्स रुग्णालयात दाखल झाली. तिने गोंडस बाळाला जन्मही दिला व त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत महिलेचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाइकांनी रुग्णालयात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. जिन्सी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. पोलीस बंदोबस्तात महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटीत दाखल करण्यात आला. प्रसूतीसाठी गेलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची जिन्सी हद्दीतील ही दुसरी घटना होय.
बारूदगरनाला येथील फिरदोस बेगम शेख एजाज (२५) या गरोदर महिलेस नातेवाइकांनी सोमवारी रात्री ११ वाजता प्रसूतीसाठी जिन्सी पोलीस ठाण्याशेजारील रुग्णालयात दाखल केले होते. डॉ. सीमा खान यांनी महिलेची प्रसूती केली. तिने बाळाला जन्म दिला. प्रसूतीनंतर फिरदोस बेगम यांनी नातेवाइकांशी संवादही साधला. त्यानंतर मात्र अचानक बाळंतिणीची प्रकृती चिंताजनक झाली. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला; मात्र डॉक्टरांचे प्रयत्न निष्फळ ठरले. महिलेचा मृत्यू झाल्याचे कळताच नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच फिरदोस बेगम हिचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत महिला डॉक्टरांना शिवीगाळ करीत तोडफोड करण्याचा प्रयत्न केला.
जिन्सी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत नातेवाईकांची समजूत घातली. प्रचंड फौजफाटा तैनात केल्याने मृत महिलेचे नातेवाईक नरमले. पोलीस निरीक्षक वसूरकर यांनी पोलीस बंदोबस्तात महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटीत रवाना केला. मृत फिरदोस बेगम हिचा पती शेख एजाज हा शहरात स्टोव्ह रिपेअरिंगचे काम करतो. त्यांना तीन मुले आहेत.
अहवालात मृत्यूचे कारण कळेल
घाटीच्या डॉक्टरांनी शवविच्छेदन केले असून, व्हिसेरा राखून ठेवला आहे. अहवाल मिळाल्यानंतर तिचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला, हे समजणार आहे. अहवाल मिळाल्यांनतर संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे जिन्सी पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार हिवराळे यांनी सांगितले. सध्या जिन्सी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.