लग्न तुमचे, आहेर मात्र सरकारला; सगळ्याच वस्तूंवर द्यावे लागतात पैसे
By प्रशांत तेलवाडकर | Published: December 2, 2022 07:19 AM2022-12-02T07:19:38+5:302022-12-02T07:21:32+5:30
सरासरी एका लग्नाचा खर्च १० लाख रुपयांपर्यंत असेल, तर सरासरी ९२ हजार रुपयांपर्यंत ‘जीएसटी’ भरावा लागतो. हा ‘जीएसटी’रूपी आहेरच म्हटले तर वावगे ठरणार नाही.
प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : ‘कृपया आहेर व भेटवस्तू आणू नये, आपली उपस्थिती हाच अनमोल आहेर,’ अशी सूचना लग्नपत्रिकेवर छापलेली असते. मात्र, तुम्ही वऱ्हाडींकडून आहेर घ्या किंवा घेऊ नका. लग्न लावले की, त्या बदल्यात सरकारला आहेर द्यावाच लागतो. हे वाचल्यावर तुम्ही म्हणाल, काय थट्टा लावली, सरकार कशाला मागेल आहेर... तर ही थट्टा नव्हे सत्य आहे. सरासरी एका लग्नाचा खर्च १० लाख रुपयांपर्यंत असेल, तर सरासरी ९२ हजार रुपयांपर्यंत ‘जीएसटी’ भरावा लागतो. हा ‘जीएसटी’रूपी आहेरच म्हटले तर वावगे ठरणार नाही.
लग्न म्हटल्यावर उदंड उत्साह व खर्चही भरमसाठ. मात्र, तुम्ही मुला-मुलीच्या लग्नासाठी जो खर्च करता त्यावर सरकारची नजर आहे. मंगल कार्यालय, लॉन्स, केटरर्स, दागिने, कपडे, लग्नपत्रिका, फोटो-व्हिडीओ शूटिंग आदींचे बिल घेतले की, ‘जीएसटी’ लागणारच.
भरते सरकारी तिजोरी
एका साधारण लग्नात सरासरी १० लाख ६ हजार ५०० रुपये खर्च आला, तर त्यात सरासरी ९२ हजार २० रुपये ‘जीएसटी’चा समावेश असतो. म्हणजे तुम्ही लग्नावर केलेल्या खर्चातील कररूपात सुमारे १ लाख रुपये सरकारी तिजोरीत जमा होतात.
प्रकार रक्कम रु. जीएसटी तिजोरीत जमा
मंगल कार्यालय १,५०,००० १८% २७,०००
लग्नपत्रिका (४०० नग) ५,००० १८% ९००
सुरुची भोजन (५०० लोक) १,२५,००० ५% ६,०००
दागिने (५ तोळे) २,७५,००० ३% ८,२५०
बस्ता १,५०,००० ५-१२% १२,०००
डेकोरेशन १,५०,००० ५% ७,५००
एसटी बस १६,५०० १८% २,८७०
अल्बम, व्हिडीओ शूटिंग १,२५,००० १८% २२५००
रुखवत १,००,००० ५% ५०००