अल्पवयीन जोडप्याचा रोखला विवाह !
By Admin | Published: May 2, 2016 11:41 PM2016-05-02T23:41:33+5:302016-05-02T23:48:38+5:30
अविनाश मुडेगावकर ल्ल अंबाजोगाई नवरदेव व नवरी दोघेही अल्पवयीन ठरल्याने महाराष्ट्र दिनी प्रशासनाने ऐनवेळी विवाह रोखला. हा प्रकार अंबाजोगाई तालुक्यात ममदापूर (परळी) येथे झाला.
ममदापूर परळीतील प्रकार : नवरीविनाच वऱ्हाडाला परतण्याची ओढावली नामुष्की
अविनाश मुडेगावकर ल्ल अंबाजोगाई
नवरदेव व नवरी दोघेही अल्पवयीन ठरल्याने महाराष्ट्र दिनी प्रशासनाने ऐनवेळी विवाह रोखला. हा प्रकार अंबाजोगाई तालुक्यात ममदापूर (परळी) येथे झाला. गावात एकाच मांडवात सहा लग्न होणार होते. पैकी पाच विवाह झाले. मात्र, एका वऱ्हाडाला व नवरदेवाला नवरीविनाच परतावे लागले.
ममदापूर (परळी) येथील सीता ग्यानदेव लवटे हिचा विवाह धारूर तालुक्यातील सुरनरवाडी येथील बाबाराव चंद्रकांत काळे याच्याशी जुळला होता. विवाहासाठी १ मे रोजी दुपारी १२.३५ चा मुहूर्त निवडला होता. या विवाहासोबतच इतर पाच विवाहही होणार होते. एका मांडवात सहा विवाह असल्याने गावकऱ्यांनी जय्यत तयारी केली होती.
रविवारी वधूपित्यांसह गावकरी लगबगीत होते. पोलीस व महसूल प्रशासनाची दोन वाहनेही गावात धडकली. सुरुवातीला हे सरकारी पाहुणे विवाहासाठी आले असावेत, असे वाटले;पण झाले वेगळेच. अधिकाऱ्यांनी थेट सीता लवटे, बाबाराव काळे या जोडप्याची चौकशी सुरु केली. नायब तहसीलदार बाळकृष्ण वांजरखेडकर, मंडळ अधिकारी बाबूराव दळवी, ग्रामीण ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ गिते यांनी शहानिशा केली असता नवरीचे वय १५ तर नवरदेवाचे वय १७ एवढे असल्याचे समोर आले.
लेखी घेतले
महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त पंचानामा केला. त्यानंतर वधू- वर व त्यांच्या नातेवाईकांकडून अल्पवशीन असल्याने विवाह रद्द करत असल्याचे लेखी लिहून घेतले.
तक्रार अर्जावरुन कारवाई
नवरदेवाच्या भावकीतील एकाने ममदापूर (परळी) येथे बालविवाह होत असल्याची तक्रार अप्पर पोलीस अधीक्षकांसह तहसीलदार, ग्रामीण ठाणे निरीक्षक यांच्याकडे केली होती. अर्जासोबत नवरदेवाची जन्मतारीख ५ जुलै १९९९ असल्याचा निर्गम उतारा व लग्नपत्रिका पुरावा जोडला होता. त्यावरून खातरजमा झाली.
बोहल्यावर चढण्यापूर्वीच बाबाराव- सीताचा हिरमोड !
बाबाराव व नियोजित वधू सीता हे दोघेही गरीब कुटुंबातील. अल्पवयीन ठरल्याने त्यांचा विवाह रोखण्यात आला. इतर पाच विवाह ठरल्याप्रमाणे झाले. अंगावर हळद... हातावर मेहंदी... डोक्यावर मुंडावळ्या... व बोहल्यावर चढण्याचे वेध लागलेल्या बाबाराव व सीता यांना अपुऱ्या वयामुळे ऐनवेळी माघार घ्यावी लागली. त्यामुळे त्यांचा हिरमोड झाला. त्यांना इतर पाच जोडप्यांच्या विवाहात वऱ्हाडी बनण्याशिवाय पर्यायच उरला नाही. त्यानंतर वरपक्षाकडील मंडळी नवरीविनाच आपल्या गावी परतले.