गरीबीमुळे १४ वर्षाच्या मुलीचे लग्न ठरवले; मुली भेटत नाही म्हणून विसाव्या वर्षीच मुलगा बोहल्यावर

By सुमित डोळे | Published: December 7, 2023 01:57 PM2023-12-07T13:57:27+5:302023-12-07T13:59:48+5:30

वधू-वर येताच वरात निघाली ठाण्यात; मुली भेटत नाही विसाव्या वर्षीच मुलाला बोहल्यावर बसवले

Marriage of 14-year-old girl decided due to poverty; boy in his twenties getting married due to does not meet girls | गरीबीमुळे १४ वर्षाच्या मुलीचे लग्न ठरवले; मुली भेटत नाही म्हणून विसाव्या वर्षीच मुलगा बोहल्यावर

गरीबीमुळे १४ वर्षाच्या मुलीचे लग्न ठरवले; मुली भेटत नाही म्हणून विसाव्या वर्षीच मुलगा बोहल्यावर

छत्रपती संभाजीनगर : तीन मुली झाल्यानंतर वडील लहानपणीच सोडून गेले. घरी कायम अठराविश्वे दारिद्र्य. त्यामुळे धुणी-भांडे करणाऱ्या आईने १४ व्या वर्षीच मुलीचे लग्न ठरवले. तर समाजात मुली भेटत नाही म्हणून वराच्या आई-वडिलांनी विसाव्या वर्षीच मुलाला बोहल्यावर बसवले. दामिनी पथकाला ही बाब समजताच त्यांनी बुधवारी दुपारी १ वाजता पडेगाव परिसरात धाव घेत निघालेली लग्नाची वरात थेट ठाण्यात नेली.

पडेगाव परिसरात अल्पवयीन मुलगी व मुलाचा विवाह लावला जात असल्याची माहिती बुधवारी नियंत्रण कक्षाला प्राप्त झाली. उपनिरीक्षक कांचन मिरधे यांनी तत्काळ सहकाऱ्यांसह पडेगावच्या दिशेने धाव घेतली. परिसरात पाहणी केली असता एका चौकात मंडप आढळून आला. अंमलदार लता जाधव, संगीता परळकर, अमृता भोपळे, सुरेखा कुकलारे, मनीषा तायडे या साध्या वेशात वऱ्हाडी बनून लग्नात सहभागी झाल्या. त्या नातेवाईक म्हणून मंडपात बसून राहिल्या. तरी वधू-वर आले नाही. अखेर, दोन तासांनी वधू-वर येताच दोघेही लहान असल्याची खात्री झाली. मिरधे, चाईल्ड हेल्पलाईनचे सचिन दौंड यांनी तत्काळ आत धाव घेतली.

वधू-वरांनी लग्नमंडपात प्रवेश करताच अचानक समोर आलेल्या पोलिसांना पाहून मंडपात एकच धांदल उडाली. काही नातेवाइकांनी लांब राहण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने परिस्थिती सावरली. वधू-वराला वय विचारले असता दोघेही घाबरल्याने त्यांना सांगता आले नाही. पोलिसांनी दोघांचे आधार कार्ड व शाळेची टीसीची मागणी केली. वधू-वरासह दोन्हीकडील कुटुंबाला छावणी पोलिस ठाण्याचे निरीक्षक कैलास देशमाने यांच्यासमोर हजर करण्यात आले. देशमाने यांनी चाैकशी केली. तेव्हा मुलीच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याचे समोर आले. नात्यातीलच असल्याने दोन्ही कुटुंब लग्नास तयार झाले. मात्र, हा बालविवाह असून कायद्याने गुन्हा असल्याचे पोलिसांनी सांगितले व पुढील कारवाईसाठी मुलीला बालकल्याण समितीकडे सोपवले.

Web Title: Marriage of 14-year-old girl decided due to poverty; boy in his twenties getting married due to does not meet girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.