माजी आमदाराच्या मुलाचे लग्न; पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:04 AM2021-05-06T04:04:37+5:302021-05-06T04:04:37+5:30
मंगल कार्यालय मालकाला ५० हजार रुपये दंड औरंगाबाद : पैठणचे माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या मुलाच्या विवाह समारंभात कोविड ...
मंगल कार्यालय मालकाला ५० हजार रुपये दंड
औरंगाबाद : पैठणचे माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या मुलाच्या विवाह समारंभात कोविड नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून चिकलठाणा पोलिसांनी लॉन्स मालकावर गुन्हा नोंदवून ५० हजार रुपये दंड ठोठावला. चितेपिंपळगाव येथे मंगळवारी हा विवाहसोहळा पार पडला.
वाघचौरे यांच्या मुलाचा आणि गारखेड्यातील गणेश भारत चौधरी यांच्या मुलीचा विवाह ४ मे रोजी चितेपिंपळगावातील बागडे पाटील लॉन्सवर पार पडला. २५ वऱ्हाडी आणि २ तासात लग्न उरकण्याच्या अटीवर लग्नसमारंभाला परवानगी आहे. असे असताना विनापरवानगी हा विवाह समारंभ आयोजित केला.
या लग्नात गर्दी झाल्याची माहिती चिकलठाणा पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी तेथे धाव घेतली. तोपर्यंत लग्न आटोपून अनेक वऱ्हाडी निघून गेले होते. मात्र कोविड नियमाचे उल्लंघन झाल्याचे त्यांना दिसून आले. चितेगाव ग्रामपंचायत कोविड-१९ चे समिती सदस्य पांडुरंग सर्जेराव सोनवणे यांच्या तक्रारीवरून चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी लॉन्स मालक प्रल्हाद कडुबा बागडे यांना ५० हजार रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती सहायक निरीक्षक विश्वास पाटील यांनी दिली.