पत्नीला सहलीला पाठवून दुसरीसोबत धूमधडाक्यात केले लग्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 10:59 PM2019-06-01T22:59:55+5:302019-06-01T23:00:20+5:30
पत्नी आणि सासूबाईला सहलीसाठी इंदूरला पाठवून वनरक्षकाने दुसरीसोबत धूमधडाक्यात लग्न केल्याची घटना हर्सूल गावात घडली. हा प्रकार समजल्यानंतर बाहेरगावाहून आलेल्या विवाहितेने पोलीस ठाण्यासमोर रास्ता रोको करून आरोपी पतीसह ११ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला. एवढेच नव्हे, तर पोलीस संरक्षणाची मागणी केली.
औरंगाबाद : पत्नी आणि सासूबाईला सहलीसाठी इंदूरला पाठवून वनरक्षकाने दुसरीसोबत धूमधडाक्यात लग्न केल्याची घटना हर्सूल गावात घडली. हा प्रकार समजल्यानंतर बाहेरगावाहून आलेल्या विवाहितेने पोलीस ठाण्यासमोर रास्ता रोको करून आरोपी पतीसह ११ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला. एवढेच नव्हे, तर पोलीस संरक्षणाची मागणी केली.
पती गणेश राधाकिसन पचलोरे (३०), सासरा राधाकिसन पचलोरे, दीर संतोष पचलोरे, उत्तम पचलोरे, नणंद सुरेखा हरणे, सतीश हरणे, विशाल गवंडर, प्रशांत, हिरालाल हरणे आणि दोन महिलांचा आरोपींमध्ये समावेश आहे. हर्सूल पोलिसांनी सांगितले की, हर्सूल येथील रहिवासी प्रतिभा आणि गणेश पचलोरे हे एकाच गल्लीतील रहिवासी आहेत. चार वर्षांपूर्वी त्यांचा आंतरजातीय प्रेमविवाह झाला. लग्नानंतर त्यांना मूलबाळ झाले नाही. २६ मे रोजी गणेशने घरी मटनाची भाजी केली आणि प्रतिभाच्या आईला जेवणासाठी बोलावले. त्यांच्या जेवणात काहीतरी औषध त्याने टाकल्याने प्रतिभा आणि तिच्या आईला जेवणानंतर त्रास होऊ लागला. त्यानंतर गणेशने त्यांना नाचनवेल येथील रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने त्याचा मित्र आणि कुटुंबियांसोबत प्रतिभा आणि तिच्या आईला मध्यप्रदेशातील इंदूर येथे सहलीला पाठविले. मुंबईला महत्त्वाचे काम असल्याने तुमच्यासोबत सहलीला येऊ शकत नाही, अशी थाप त्याने मारली.
पत्नी, सासूला इंदूरला पाठविल्यानंतर ३१ मे रोजी गणेशने हर्सूल येथे घरासमोर दुसºया मुलीसोबत मोठ्या धूमधडाक्यात लग्न करण्याचे निश्चित केले होते. इंदूरला गेलेल्या प्रतिभाला याबाबत कुणकूण लागल्यानंतर ती सहल अर्धवट सोडून औरंगाबादला परतली. तोपर्यंत लग्न आटोपून गणेश नवरीसह पसार झाल्याचे प्रतिभाला समजले. प्रतिभा, तिची आई आणि अन्य नातेवाईक हर्सूल पोलीस ठाण्यात दाखल झाले. दुसरे लग्न करून फसवणूक करणाºया पतीसह सासरच्या ११ जणांविरोधात तिने फिर्याद नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग भागिले आरोपींचा शोध घेत आहेत.
हर्सूल ठाण्यासमोर केले आंदोलन
पोलीस संरक्षणात मला सासरी नेऊन घाला, अशी मागणी प्रतिभाने पोलिसांकडे केली. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी तिची मागणी फेटाळल्याने तिने चक्क हर्सूल ठाण्यासमोरील महामार्गावर झोपून आंदोलन सुरू केले. अचानक झालेल्या या अांदोलनाने पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. पोलिसांनी तिची आणि नातेवाईकांची समजूत काढत आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तिने आंदोलन मागे घेतले.