गेला झोका चालला माहेराले जी, आला झोका पलट सासराले जी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 02:25 PM2019-03-04T14:25:06+5:302019-03-04T14:27:57+5:30

माहेर-सासर एकच असलेलं गाव, लेकीच्या घरातील भांड्याच्या आवाज येतो माहेरात

marriages in same village at Aurangabad | गेला झोका चालला माहेराले जी, आला झोका पलट सासराले जी!

गेला झोका चालला माहेराले जी, आला झोका पलट सासराले जी!

- सुनील गिऱ्हे  

औरंगाबाद :

गेला झोका गेला झोका, चालला माहेराले जी
आला झोका आला झोका पलट सासराले जी...

 

बहिणाबार्इंच्या ओळींची अनुभूती यावी असंच एक गाव औरंगाबादपासून हाकेच्या अंतरावर सुखात नांदत आहे. गल्लीत बांधलेल्या झोक्याच्या एका टोकाला माहेर, तर दुसऱ्या टोकाला सासर, मिळालेल्या लेकींच्या संसाराचे वेलू बाळापुरात बहरून आले आहेत. लेकीच्या घरात पडलेल्या भांड्याचा आवाजही माहेरात खुशालीचा निरोप घेऊन येतो इतकं दिलासादायक चित्र बाळापुरात बघायला मिळतंय!

औरंगाबादपासून १० किमी. अंतरावर असलेल्या बाळापूरचा आकार केवढा, तर पाच गल्ल्या आणि ५० उंबरठे. लोकसंख्या १२००.  या गावाच वेगळेपण काय तर इथे गावातच विवाह करणाऱ्या जोडप्यांची संख्या भरपूर आहे. असे तब्बल २५ विवाह पार पडले आहेत. खास म्हणजे ना कुठला टोकाचा वाद, ना धुसपुस. सगळा आनंदीआनंद. खटके उडालेच, तर वडिलधारी मंडळी वाद मिटवून संसाराची घडी बसून देतात. त्यामुळे या जोडप्यांना पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागलेली नाही. 

गावातच असले तरी मिळतो पाहुणचार
गावातल्या गावात लग्न झाले तरी विवाहापूर्वी आणि नंतरच्या सगळ्या परंपरा अजूनही पाळल्या जातात. मुलीचे सासर अवघ्या ५० फुटांवर असले, तरी मामा किंवा भाऊ मुलीला घ्यायला जातात. त्यांना पाहुणचार केला जातो. नवीन कपडे तसेच गोड जेवणानंतर मुलीला माहेरी पाठविले जाते. मुलीला घेण्यासाठी सासरची मंडळी गेल्यानंतर त्यांचाही दूरच्या पाहुण्यांप्रमाणे पाहुणचार होतो.  

निवडणूक ठरते रंगतदार
गावातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या इतिहासात बहुतांश उमेदवार २ ते ४ मतांनी पराभूत किंवा विजयी होतात. निवडणुकीची गंमत म्हणजे नाते-गोते एकमेकांत एवढे गुंतले आहेत की, कुणाचे मतदान कुणाला मिळेल? हे देवही सांगू शकत नाही. समोरच्या घरात दिलेल्या मुलीचे मतदान पडेल किंवा नाही, अंदाज बांधणे भल्याभल्यांना जड जाते. त्यामुळे प्रत्येकवेळी ही निवडणूक रंजक ठरते. 

एकही तक्रार नाही
बाळापूर गावातल्या गावात २५ विवाह झाल्याची माहिती मिळाली. यापैकी जवळपास एकाही जोडप्याने आतापर्यंत पोलीस ठाण्याची पायरी चढलेली नाही. पती, पत्नीमध्ये किरकोळ वाद झाल्यास तो वादही तंटामुक्त समितीच्या माध्यमातून मिटविण्यात येतो, असे चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सपोनि. सत्यजित ताईतवाले म्हणाले.

मुलांकडून परंपरा कायम 
वडिलांनी गावातच विवाह केल्यानंतर मुलांनीसुद्धा ही परंपरा कायम ठेवलीय. माणिकराव खाडे यांनी कौसाबाई यांच्याशी विवाह केला. त्यांचा मुलगा सोमीनाथ खाडे यांनी आणि सोमीनाथ खाडे यांच्या भारत व उद्धव या दोन्ही मुलांचे विवाह गावातल्याच मुलींशी झाले. गोपीचंद औताडे यांचाही गावातच विवाह झाल्यानंतर मुलगा उत्तम औताडे यांनीसुद्धा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवले. बाजीराव वाघ यांच्यानंतर मुलगा भगवान वाघसुद्धा गावातीलच मुलीसोबत विवाह बंधनात अडकला. येथील सोनाजी खाडे यांचा विवाह गावातच पार पडल्यानंतर त्यांचा मुलगा रामनाथसुद्धा गावचाच जावई झाला. 

माजी सरपंच रावसाहेब पवार यांच्या मुलीसह बहिणीचाही विवाह गावातच झाला आहे. त्याआधी माजी सरपंच रामराव खाडे यांच्या भावाची पत्नीसुद्धा गावातीलच आहे. अशा गोतावळ्यामुळे गावात मतदानाच्या वेळी काय परिस्थिती असेल, याबाबत नेहमीच पाहुणे विचारत असतात. 
-नीलाबाई खाडे, सरपंच

माहेर-सासर एकाच गावात आहे. त्यामुळे सणाला माहेर  आणि सासर कुठेही राहिले तरी सारखेच आहे. सासर असते तर सणाला माहेरी येता आले असते. मात्र, सुख-दु:खात माहेरची मंडळी त्वरित धावून येतात, ही जमेची बाजू आहे. -वैशाली औताडे

गावातल्याच गावात विवाह करणाऱ्या जोडप्यांत वाद नाहीत. त्यामुळे पोलीस ठाण्याची पायरी चढण्याची गरज पडत नाही.
-सुभाष पवार, अध्यक्ष, तंटामुक्त समिती  (यांच्या बहिणीचाही गावातच विवाह झाला आहे.)

अशा विवाहामुळे मुलासह मुलीच्या वडिलांची आर्थिक बचत होते. त्यासोबतच श्रमही वाचतात. तसेच संकटप्रसंगी तात्काळ धावून जाता येते. त्यामुळे गावातल्या गावात विवाह करणे हे फायद्याचेच आहे. 
-रामराव खाडे, माजी सरपंच

माझ्या मोठ्या बहिणीला गावातच दिले आहे. इतर बहिणी बाहेरगावी दिल्या आहेत. बाहेरगावी असलेल्या बहिणींकडे केवळ एखाद्या कार्यक्रमालाच जाणे होते. मात्र, गावात असलेल्या बहिणीकडे नेहमीच जाणे होते. तसेच अडीअडचणीच्या वेळी मदत करता येते.
- गणेश वाघ, ग्रामस्थ.

गावातील इतर मुले दिवाळी, तसेच उन्हाळ्याच्या सुटीत मामाच्या गावाला जातात. माझे आई-वडील गावातीलच असल्याने आम्हाला लांब मामाच्या गावाला जात येत नाही. मात्र, आम्हाला आजी-आजोबा, मामा-मामी रोज भेटतात. त्याचा आनंद आहे. 
-धनश्री खाडे, विद्यार्थिनी 

Web Title: marriages in same village at Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.