प्रेमविवाह केलेल्या जोडप्याला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 04:41 AM2019-05-27T04:41:33+5:302019-05-27T04:41:37+5:30
मुलीच्या नातेवाईकांना कळताच त्यांनी जोडप्यासह मुलांच्या नातेवाईकांना बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी सकाळी वैजापूर तालुक्यातील नालेगाव येथे घडली.
शिऊर : एक महिन्यापूर्वी घरातून पळून जाऊन प्रेमविवाह केलेले जोडपे घरी परतल्याची माहिती मुलीच्या नातेवाईकांना कळताच त्यांनी जोडप्यासह मुलांच्या नातेवाईकांना बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी सकाळी वैजापूर तालुक्यातील नालेगाव येथे घडली.
मारहाणीत चार जण गंभीर जखमी झाले असून, दोन महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत. जखमींवर शिऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुलाचे काका कैलास पवार (४२), वडील श्रीधर पवार (६९), आजोबा जगन्नाथ पवार (८०), भाऊ गणेश (२३) हे गंभीर जखमी झाले आहेत. मुलाची आई मीराबाई श्रीधर पवार व चुलती अलका कैलास पवार हे किरकोळ जखमी झाले आहेत.
वैजापूर तालुक्यातील साकेगाव येथील तरुणीची व नालेगाव येथील तरुणाची एका लग्न समारंभात काही महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघे एकाच समाजाचे असल्याने दोघांनीही लग्न करायचे ठरविले होते. कुटुंबीयांना माहिती दिली होती. मात्र, तरुणीच्या कुटुंबीयांनी लग्नास स्पष्ट नकार दिला होता. तरुणाच्या नातेवाईकांनी मात्र हा विषय त्याच्यावर सोपवला होता. दोघांनी अखेर पळून २ मे रोजी आळंदी येथे लग्न केले. गोरख शिंदे, मीनाबाई शिंदे, अशोक मोगल, जिजाबाई मोगल, दादासाहेब मोगल, कैलास गायके यांच्यावर गुन्हा करण्यात आला आहे.