एक लाख रुपयांसाठी विवाहितेस जिवे मारले
By Admin | Published: September 8, 2014 12:02 AM2014-09-08T00:02:39+5:302014-09-08T00:05:09+5:30
परभणी: माहेरहून एक लाख रुपये घेऊन ये म्हणून विवाहितेस गळफास देऊन जिवे मारल्याप्रकरणी सासरच्या सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
परभणी: माहेरहून एक लाख रुपये घेऊन ये म्हणून विवाहितेस गळफास देऊन जिवे मारल्याप्रकरणी सासरच्या सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात परभणी ग्रामीण पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
यासंदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी- तालुक्यातील भोगाव साबळे येथील जयश्री रामेश्वर पांचाळ या महिलेने ५ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी ज्ञानेश्वर पांचाळ यांच्या माहितीवरुन परभणी ग्रामीण पोलिस ठाण्यात सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर ६ सप्टेंबर रोजी मयत महिलेचा भाऊ ज्ञानेश्वर निवृत्ती घनमुळे रा.सेनगाव यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात सासरच्या लोकांविरुद्ध तक्रार नोंदविली आहे. त्यावरुन खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. ज्ञानेश्वर घनमुळे यांच्या तक्रारीनुसार सासरच्या मंडळींनी जयश्री पांचाळ हिचा छळ केला. सुतारकाम करण्यासाठी मशीन घ्यावयाची आहे. त्यासाठी माहेरहून १ लाख रुपये घेऊन ये म्हणून जयश्रीचा छळ केला आणि त्यातूनच घरी गळफास देऊन जिवे मारले. या तक्रारीवरुन पती रामेश्वर पांचाळ, सासरा नरहरी पांचाळ, सासू कावेरीबाई पांचाळ यांच्यासह दीर श्याम, ज्ञानेश्वर, संतोष आणि जाऊ सुभद्रा या सात जणांविरुद्ध परभणी ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी पती रामेश्वर, सासरा नरहरी आणि सासू कावेरीबाई यांना अटक केली आहे. परभणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक एम.एम. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बापू लाड, जमादार गायकवाड, शेख उस्मान, भारत तेलंग या प्रकरणाचा तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)