सोशल मीडियाच्या ओळखीतून अत्याचार, ब्लॅकमेल; पीडितेच्या कुटुंबाने तरुणाचे केले अपहरण 

By सुमित डोळे | Published: December 13, 2023 01:06 PM2023-12-13T13:06:38+5:302023-12-13T13:11:57+5:30

अत्याचार, ब्लॅकमेलचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडितेच्या कुटुंबाने तरुणाला समजावूनही सांगितले. मात्र, परिस्थिती बदलली नाही.

married women sexual harassed and blackmailed by Social media friend ; The victim's family kidnapped the youth | सोशल मीडियाच्या ओळखीतून अत्याचार, ब्लॅकमेल; पीडितेच्या कुटुंबाने तरुणाचे केले अपहरण 

सोशल मीडियाच्या ओळखीतून अत्याचार, ब्लॅकमेल; पीडितेच्या कुटुंबाने तरुणाचे केले अपहरण 

छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावर ओळखीनंतर मैत्री केलेल्या तरुणाने २८ वर्षीय विवाहितेच्या खासगी क्षणांचे छायाचित्र काढून वारंवार अत्याचार केले. विविध कारणांवरून दागिने, पैसेही घेतले. हा प्रकार पीडितेच्या कुटुंबाला कळाला. कुटुंबाने तरुणाला समजावूनही सांगितले. मात्र, परिस्थिती बदलली नाही. पीडितेच्या कुटुंबाने अखेर त्याचे विमानतळ परिसरातून अपहरण करून बेदम झोडपले. १० तास एका खाेलीवर नेऊन गुप्तांगावर जखमा केल्या. सौरव चंद्रभूषण दंडिमे (२८, रा. मुकुंदवाडी) असे त्याचे नाव असून त्याच्यावर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

२८ वर्षीय पीडितेच्या तक्रारीतील आरोपानुसार, एप्रिल २०१९ मध्ये तिची फेसबुकवर सौरवसोबत ओळख झाली. दीड महिन्यात मैत्री व क्रमाने भेटीही वाढल्या. २३ एप्रिल २०२२ रोजी सौरवला वाढदिवसानिमित्त पीडितेने सोन्याची अंगठी भेट दिली. त्याच दरम्यान सौरवचे पीडितेच्या घरी जाणेही वाढले. मात्र, त्यानंतर पीडितेने त्याला घरी येण्यास नकार दिला. संसार उद्ध्वस्त होईल, असे सांगून विनवण्या केल्या. सौरवने मात्र तिचे चोरून खासगी क्षणांचे काढलेले छायाचित्र दाखवून व्हायरल करण्याची धमकी दिली. ब्लॅकमेल करून अत्याचार सुरू केले. त्याच्या मागणीनुसार त्याला पीडितेने अनेकदा मोठमोठ्या रकमा दिल्या. छायाचित्र डिलिट करण्यासाठी त्याने पीडितेला पैसे मागितले. तेव्हा त्याने ८ तोळ्यांच्या बांगड्या घेतल्या. आयफोन घेण्यासाठी पुन्हा सोन्याचा नेकलेस व ४ तोळ्यांचे सोन्याचे दागिने घेतले.

अखेर कुटुंबाला कळाले
संसार वाचवण्यासाठी ब्लॅकमेलिंगला बळी पडून महिला पैसे, दागिने देत गेली. ऑक्टोबर, २०२२ मध्ये तिच्या पतीला हा प्रकार कळाला. त्याने सौरवच्या भावजीच्या टाऊन सेंटर परिसरातील हॉटेलमध्ये जाऊन समजावून सांगितले. सौरवने उलट पीडितेच्या पतीलाच मारहाण केली. कुटुंबाची अब्रू राखण्यासाठी त्यांनी तक्रार देणे टाळले. डिसेंबर, २०२३ मध्ये पीडितेच्या वडिलांना प्रकार कळाला. त्यांनी १० डिसेंबर रोजी भाऊजींच्या घरी सौरवच्या कुटुंबाला समजावून सांगितले. त्याच्या आई-वडिलांनी पैसेही परत करू व पीडितेला त्रास होणार नाही, असे लिहून दिले. मात्र, प्रकरण मिटलेच नाही. अखेर ११ डिसेंबर रोजी सकाळी पीडितेने पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात सौरवविरोधात तक्रार दिली.

गुंडांकडून अपहरण; १० तास फिरवत हाल केले
प्रकार कळाल्यापासून पीडितेचे संतप्त पती, भाऊ, वडील त्याचा शोध घेत होते. त्यांनी नऊ ते दहा गुंडांना सोबत घेतले. ९ डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजता चिकलठाणा विमानतळ रस्त्यावर इनोव्हा कारने ओव्हरटेक करून सौरवची गाडी अडवली. सौरवने कार काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दुसऱ्या कारने त्याचा रस्ता अडवला. गुंडांनी उतरून त्याच्या गाडीच्या काचा फोडून बाहेर काढले. मारहाण करत अंगठ्या, मोबाइल हिसकावला. कारमध्ये बसवून पिसादेवी मार्गे आंबेडकर चौक, बळीराम पाटील चौक, आझाद चौकातून किराडपुऱ्यातील एका इमारतीत नेले. तेथे आधीच पीडितेचा पती, वडील व भाऊ होते. सौरव कारमधून उतरताच त्याच्यावर त्यांनी बांबूने हल्ला चढवला. त्याचे सर्व कपडे काढून चित्रीकरण केले. आधार, पॅन कार्डची झेरॉक्स बॉण्डला लावून त्याच्या सह्या घेतल्या. गुप्तांगात वस्तू घालण्याचा प्रयत्न केला. यात सौरव गंभीर जखमी झाला. रात्री साडेदहापर्यंत हा छळ सुरू होता. त्यानंतर रक्तबंबाळ सौरवला दुसरे कपडे परिधान करण्यासाठी दिले. दोन अज्ञातांनी त्याला दुचाकीवर बसवून बळीराम पाटील शाळेसमोर सोडले. सौरवने कसे तरी कार्यालय गाठले. त्यानंतर वडिलांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक गौतम पातारे यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक आत्माराम घुगे यांनी त्याचा रुग्णालयातच जबाब नोंदवला. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबासह अन्य ९ जणांवर गुन्हा दाखल केला. दरम्यान, पीडितेचे कुटुंब पसार झाले.

Web Title: married women sexual harassed and blackmailed by Social media friend ; The victim's family kidnapped the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.