भरदिवसा लुटणारी टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 12:22 AM2017-08-09T00:22:45+5:302017-08-09T00:22:45+5:30
बँकेतून पैसे घेऊन जाणाºया व्यक्तींवर पाळत ठेवायची. त्यांचा पाठलाग करून संधी मिळताच डोळ्यात मिरचीपूड टाकून रोख रक्कम लुटायची, अशा प्रकारचे गुन्हे करणाºया टोळीतील पाच संशयितांना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : बँकेतून पैसे घेऊन जाणाºया व्यक्तींवर पाळत ठेवायची. त्यांचा पाठलाग करून संधी मिळताच डोळ्यात मिरचीपूड टाकून रोख रक्कम लुटायची, अशा प्रकारचे गुन्हे करणाºया टोळीतील पाच संशयितांना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. चौकशीत त्यांनी जालना, पाटोदा व पैठण, गेवराई, अहमदनगर येथे लुटमार केल्याची कबुली दिली आहे.
याबाबत पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. अंबड तालुक्यातील पाथरवाला येथील कल्याण पवार व त्यांचा मुलगा संजय यांनी रजिस्ट्रीच्या कामानिमित्त बँकेतून पैसे काढले. सदर रक्कम घेवून ते दुचाकीवरून अंबडकडे निघाले होते. दरम्यान, दुचाकीस्वार चौघांनी त्यांचा पाठलाग करून ढाकलगाव शिवारात त्यांना अडविले. डोळ्यात मिरचीपूड टाकून २ लाख ५३ हजार रुपये घेवून ते फरार झाले होते. यासंदर्भात २५ जुलै रोजी गोंदी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने घटना घडल्यापासून लुटमार करणाºया संशयितांचा शोध सुरू केला. सुरेश मुरलीधर जाधव (बोधेगाव,ता.शेवगाव,जि.नगर) हा टोळी तयार करून अशा प्रकारचे गुन्हे करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तद्नंतर पोलिसांनी सुरेश जाधव याच्यावर पाळत ठेऊन त्यास ताब्यात घेतले.
त्याच्याकडून माहिती घेत त्याचे साथीदार सिद्धीकी शामद शेख (२१, पिंगेवाडी, शेवगांव), उमेश बंडू कायस्थ (२१), लक्ष्मण शिवनाथ तोतरे, (२५), योगेश विष्णू गिरी (२२, सर्व रा. बोधेगाव, ता. शेवगाव,जि.नगर) यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे व मुंबई येथून ताब्यात घेतले. संशयितांनी चौकशीत ढाकलगाव येथील गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या वाट्याला आलेले रोख ८० हजार रुपये काढून दिले. गुन्ह्यात वापरलेल्या ९० हजारांच्या दोन दुचाकी, चार मोबाईल, चाकू, नोटांच्या बंडलांसाठी वापरले जाणारे रॅपर, असा एकूण १ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. टोळीतील एका फरार सदस्याचा पोलीस शोध घेत आहेत.
संशयितांना गोंदी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, उपनिरीक्षक चैनसिंग गुसिंगे, कैलास कुरेवाड, भालचंद्र गिरी, विष्णू चव्हाण, संजय मगरे, प्रशांत देशमुख, रामेश्वर बघाटे, वैभव खोकले रंजित वैराळ यांनी ही कारवाई केली.