१८५७ च्या उठावातील शहिदांचा स्मृतिदिन पाळण्यात यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:04 AM2021-06-21T04:04:17+5:302021-06-21T04:04:17+5:30
औरंगाबाद : इंग्रजांविरोधात १८५७ मध्ये उठाव करण्यात आला होता. या युद्धाचा एक केंद्रबिंदू औरंगाबादही होता. या उठावात सहभागी क्रांतिकारकांना ...
औरंगाबाद : इंग्रजांविरोधात १८५७ मध्ये उठाव करण्यात आला होता. या युद्धाचा एक केंद्रबिंदू औरंगाबादही होता. या उठावात सहभागी क्रांतिकारकांना काळा चबुतरा (क्रांतीचौक) येथे तोफेच्या तोंडी देऊन शहीद करण्यात आले. काहींना फाशी देण्यात आली होती. या युद्धातील शहिदांच्या स्मृतीनिमित्त २३ जून रोजी शासकीय पातळीवर स्मृतीदिवस पाळण्यात यावा, अशी मागणी ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ डॉ. रमजान शेख यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.
तात्याराव टोपे, नानासाहेब पेशवे यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबादेतही १८५७ च्या उठावाची ठिणगी पडली होती. याची चाहूल लागताच इंग्रजांनी आपल्या सैन्यातील हिंदू-मुस्लिमांना वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पाठवून दिले. २३ जून १८५७ रोजी उठाव करणाऱ्या २१ क्रांतिकारकांना शहीद करण्यात आले. तोफेच्या तोंडाला बांधून, काहींना काळा चबुतरा येथे फाशी देण्यात आली होती. या युद्धात हिंदू-मुस्लिम यांची एकता वाखाणण्याजोगी होती. इंग्रजांनीच १८५७ च्या उठावाची घटना लिहून ठेवली आहे. त्यांच्या आधारेच विविध संदर्भ दिल्याचे डॉ. रमजान यांनी नमूद केले. औरंगाबादच्या छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांच्या सहकार्याने पुरावे गोळा केले. शासनाकडे २३ जून हा दिवस शासकीय पातळीवरही स्मृतीदवस म्हणून पाळला जावा, अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.