मरावे परी नेत्ररूपी उरावे
By Admin | Published: August 24, 2014 11:43 PM2014-08-24T23:43:17+5:302014-08-24T23:54:46+5:30
हिंगोली ‘मरावे पण नेत्ररूपी उरावे’ या म्हणीचा अंगीकार करून हिंगोली जिल्ह्यात १६१ जणांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला.
हिंगोली : ‘मरावे पण नेत्ररूपी उरावे’ या म्हणीचा अंगीकार करून हिंगोली जिल्ह्यात १६१ जणांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला. गतवर्षी त्यातील ७ जणांच्या नेत्रदानामुळे १४ जणांना नवदृष्टी लाभल्याने सृष्टीचे सौंदर्य पहावयास मिळाले. देशात आजही मागणी आणि पुरवठ्याची तफावत मोठी असल्याने प्रतिवर्षी देशाला १ लाख नेत्रांची गरज भासते.
अवयवदानामध्ये सर्वश्रेष्ठ दान म्हणजेच नेत्रदान होय. नवतंत्रज्ञानामुळे उपकरणांचा वापर व उपचार पद्धतीमुळे दिलासा मिळाला तरी अंधांना नेत्ररोपणाशिवाय पर्याय नाही. कारण भारतात वर्षाला १ लाख डोळ्यांची गरज असते. प्रत्यक्षात गेल्यावर्षी ४१ हजार जणांनी नेत्रदानातून डोळे दान केल्यामुळे माणुसच माणसाच्या कामी आला. दुसरीकडे ४६ लाख लोक बुबुळांच्या दोषामुळे (कॉर्निअल ब्लांईडनेस) अंध आहेत. प्रामुख्याने त्यात २६ टक्के मुले असून ते नेत्ररोपणानंतर बरे होवू शकतात; परंतु मागणी आणि पुरवठ्याची दरी दूर करण्यासाठी शासनाकडून २५ ते ८ सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय नेत्रदान पंधरवाडा पाळला जातो. शासन जनजागृती करीत असले तरी नेत्रदानासाठी कमी लोक पुढे येतात. त्यानुसार हिंगोलीत मागील दीड वर्षांत केवळ १६१ जणांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला. त्यातील गतवर्षी ६ जणांचे मरणोत्तर नेत्रदान केल्यामुळे १४ जणांना जग पहावयास मिळाले. आजघडीला देशाची लोकसंख्या १२५ कोटीच्या घरात असून दरवर्षी साधारणत: ३ कोटी लोक विविध कारणाने मृत्यू पावतात. त्यातील काही लोकांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला तर बऱ्याच जणांच्या आयुष्यातील अंधार दूर होऊ शकतो.
सात जणांमुळे १४ जणांना मिळाली जग पाहण्याची संधी
हिंगोलीतील दृष्टीदात्यांमध्ये तनुजी तिलकचंद रायसोनी, केशवचंद कामाजी जैैन, सुनील मनोहर दळवी, चंद्रकांत चनाप्पा जैैनापूरे, सुभाष सत्यनारायण बियाणी, सत्यनारायण चौधरी, कमलकिशोर सावरमल कयाल यांचा समावेश असल्याचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.गोपाल कदम म्हणाले.
जिल्हा रूग्णालयाच्या नेत्र विभागातील डॉ.सोनाली कदम, डॉ.गुडेवार,
डॉ. रोशनआरा तडवी, समुपदेशक पी.सी. खिल्लारे, नागनाथ काळे यांनी पंधरवाड्यानिमित्त रॅली व जगजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.एच.आर.बोरसे यांनी सांगितले.
जवळच्या नातेवाईकांच्या संमतीने कोणत्याही वयोगटातील कोणीही नेत्रदान करू शकतो. मोतीबिंदूचे आॅपरेशन झालेले, दृष्टीपटलाचे आजार असणारेही नेत्रदान करू शकतात; परंतु ज्यांच्या मृत्यूचे निश्चित कारण माहिती नसेल किंवा रॅबीज, एड्स, कावीळ, सेस्टीसेमिया, सिफीलिस रूग्ण नेत्रदान करू शकत नाहीत. दात्यांच्या मृत्यूनंतर ४ ते ६ तासांच्या आत डोळे काढावयास पाहिजे. मयताला ठेवलेल्या रुममधील सर्व पंखे बंद करावेत, डोळ्यांच्या पापण्या बंद करून ठेवाव्यात, एखादे अॅन्टीबायोटिक्स (प्रतिजैविके)चा ड्रॉप डोळ्यात टाकावा. दोन्ही डोळ्यांवर पापणी बंद केल्यानंतर थंड पाण्यात कापसाचे बोळे बुडवून पापण्यावर ठेवावेत. डोळे काढल्यानंतर विद्रुपता येत नाही व डोळे पहिल्यासारखेच दिसतात. ते डोळे दोन व्यक्तींना जग बघण्यासाठी उपलब्ध होतात व आपली आवडती व्यक्ती नेत्ररुपाने जग बघू शकते, असे नेत्रतज्ञ डॉ. किशन लखमावार यांनी सांगितले.
कॉर्निया म्हणजे काय
कॉर्निया हा एक काचे सारखा पारदर्शक असतो. कुठल्याही प्रकारचा रंग त्याला नसतो. बऱ्याच लोकांची अशी समजुत आहे की, कॉर्निया हे एक रंगीत आहे. नेत्रदान करणे म्हणजे पुर्ण डोळा बसविणे नाही तर केवळ कॉर्निया बसवतात.