मराठा क्रांती मोर्चातर्फे १ फेब्रुवारीस मशाल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 05:10 PM2021-01-28T17:10:33+5:302021-01-28T17:12:36+5:30
Maratha Kranti Morcha, Maratha Reservation साष्ट पिंपळगाव येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी औरंगाबाद मराठा क्रांती मोर्चातर्फे १ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता पिंपळगाव येथून मशाल रॅलीला सुरुवात होईल.
औरंगाबाद: मराठा आरक्षण आणि अन्य विविध मागण्यांसाठी अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे १ फेब्रुवारी रोजी साष्ट पिंपळगाव ते औरंगाबाद अशी मशाल रॅली काढली जाणार आहे. क्रांती चौकात रॅलीचा समारोप करून ठिय्या आंदोलनाला सुरुवात होणार असल्याची माहिती, संयोजक संजय सावंत यांनी आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदमध्ये दिली.
सावंत म्हणाले, साष्ट पिंपळगाव येथे २० जानेवारीपासून गावकरी मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परिसरातील अनेक गावातील मराठा समाज तिथे जात आहे. मराठा आरक्षण लढाईमध्ये समाजातील ४२ बांधवांनी आत्मबलिदान दिले. १३ हजार ७२६ आंदोलकांविरूध्द पोलिसांनी गुन्हा नोंदविले. एवढे सगळे होऊनही सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली. यानंतर स्थगिती उठविण्यासाठी शासनाने भरीव कोणतेही काम केले नाही. उलट नोकर भरती जाहीर केली. आरक्षणावरील स्थगिती उठे पर्यंत राज्य शासनाने नोकर भरती स्थगित करावी,अशी मागणी यावेळी करण्यात आली.
साष्ट पिंपळगाव येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी औरंगाबाद मराठा क्रांती मोर्चातर्फे १ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता पिंपळगाव येथून मशाल रॅलीला सुरुवात होईल. दुपारी तीन वाजता औरंगाबादेतील चौकात मशाल रॅलीचे समारोप होईल. यानंतर तेथेच ठिय्या आंदोलन सुरू केले जाईल. या पत्रकार परिषदेला अमोल साळुंके, सुभाष भोसले, गणेश उगले, प्रदीप नवले आदींची उपस्थिती होती.