शिवसेनेसाठी मशाल चिन्ह शुभ; या चिन्हावरच मोरेश्वर सावे झाले होते औरंगाबादचे खासदार
By बापू सोळुंके | Published: October 11, 2022 05:03 PM2022-10-11T17:03:24+5:302022-10-11T17:05:18+5:30
‘मशाल’सोबत शिवसेनेचे जुने नाते, याच चिन्हावर १९८९ साली औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उमेदवार मोरेश्वर सावे यांनी निवडणूक लढविली होती.
औरंगाबाद : निवडणूक आयोगाने मुंबईतील अंधेरी पोटनिवडणुकीपुरते शिवसेनेला मशाल हे निवडणूक चिन्ह दिले. या चिन्हावर मराठवाड्यातील शिवसेनेचे पहिले खासदार मोरेश्वर सावे हे विजयी झाले होते. यामुळे मशाल हे चिन्ह शिवसेनेसाठी शुभ असल्याचा दावा शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून केला जात आहे.
शिंदेगटाला मिळालेल्या पक्षाच्या नावाबद्दल नाराजी व्यक्त करीत शिवसेना नेते माजी खा. चंद्रकांत खैरे यांनी न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले. शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर खरी शिवसेना कोणाची; याविषयी वाद निर्माण झाल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आणि नाव गोठविण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी दिला. सोमवारी अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे निवडणूक चिन्ह बहाल केले. एकनाथ शिंदे यांच्या पक्षास ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव देण्यात आले. या निर्णयानंतर औरंगाबादेतील शिवसैनिकांनी ‘कहीं खुशी कही गम’ अशी प्रतिक्रिया दिली.
माजी खा. चंद्रकांत खैरे यांनी मशाल हे निवडणूक चिन्ह आमच्यासाठी शुभ असल्याचे नमूद केले. १९८९ साली औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उमेदवार मोरेश्वर सावे यांनी निवडणूक लढविली होती. तेव्हा त्यांचे मशाल हे निवडणूक चिन्ह होते. या चिन्हावर ते विजयी झाले होते. यामुळे ‘मशाल’सोबत शिवसेनेचे जुने नाते असल्याचे त्यांनी सांगितले. शिंदेगटाच्या पक्षाला मिळालेल्या नावाबद्दल आमचा आक्षेप आहे. त्यांच्या पक्षाच्या नावात बाळासाहेबांचे नाव असू नये, यासाठी आम्ही न्यायालयात धाव घेणार आहोत.
महापौर नंदू घोडेले यांनी पक्षाला मिळालेल्या नावावरून खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांचीच असल्यावर निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केल्याचे सांगितले. शिवसेनेचे महानगरप्रमुख किशनचंद तनवाणी यांनी मशाल चिन्ह हे आम्ही सर्वजण छातीवर लावून घराघरांत पोहोचवू, असे सांगितले. पक्षाला मिळालेल्या नावाबद्दल समाधान वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले.