‘मशिप्रमं’वर पुन्हा सत्ताधाऱ्याचा झेंडा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 01:02 AM2018-06-02T01:02:00+5:302018-06-02T01:03:25+5:30
धर्मदाय आयुक्तांनी विरोधी गटांची याचिका फेटाळल्यामुळे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळावर पुन्हा एकदा आ. सतीश चव्हाण गटाचेच वर्चस्व असणार हे स्पष्ट झाले. रविवारी ४ जून रोजी या संस्थेत केंद्रीय कार्यकारिणीसाठी मतदान होणार आहे.
राम शिनगारे
औरंगाबाद : धर्मदाय आयुक्तांनी विरोधी गटांची याचिका फेटाळल्यामुळे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळावर पुन्हा एकदा आ. सतीश चव्हाण गटाचेच वर्चस्व असणार हे स्पष्ट झाले. रविवारी ४ जून रोजी या संस्थेत केंद्रीय कार्यकारिणीसाठी मतदान होणार आहे.
मराठवाड्यातील सर्वांत मोठी शिक्षण संस्था असलेल्या या संस्थेच्या निवडणुकीत गेल्या वेळी माजी मंत्री प्रकाश सोळुंके, आ. सतीश चव्हाण यांनी विजय मिळविला. सध्या त्यांच्या विरोधात असलेले उद्योजक पद्माकरराव मुळे आणि मानसिंग पवार यांनी सत्ताधारी गटाने सभासद नोंदणी वाढविण्यावर आक्षेप घेत धर्मादाय आयुक्तांकडे याचिका दाखल केली होती. ही याचिका गुरुवारी धर्मादाय आयुक्तांनी फेटाळली.
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यमान कार्यकारिणीचा कार्यकाळ १० जुलै रोजी पूर्ण होत आहे. यामुळे विद्यमान सचिव आ. चव्हाण यांनी १८ मे रोजी अधिसूचना काढत आगामी कार्यकारिणीच्या निवडीसाठी ४ जून रोजी संस्थेच्या सर्वसाधारण सभा आयोजित केली. यात पुढील पाच वर्षांसाठीच्या केंद्रीय कार्यकारिणीची निवड केली जाणार आहे. मागील वेळी निवडणूक झाली तेव्हा संस्थेचे १७९ सदस्य होते. यातील अनेक जण मयत झाल्यामुळे हा आकडा १६१ पर्यंत खाली आला. याचवेळी मागील काही महिन्यांमध्ये विद्यमान केंद्रीय कार्यकारिणीने १८२ जणांना संस्थेचे सभासदत्व देण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय गोपनीय ठेवण्यात विद्यमान कार्यकारिणीला यश आले होते. निवडणुकीची अधिसूचना निघाल्यानंतर नवीन सदस्यांसह निवडणुकीची माहिती विरोधकांच्या हाती आली. तेव्हा या निवडणुकीत नवीन सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्यात येऊ नये, अशी मागणी करणारी याचिका संस्थेचे सदस्य मुळे आणि पवार यांनी धर्मादाय आयुक्तांकडे दाखल केली होती. याचिकेवर धर्मादाय आयुक्तांनी गुरुवारी निर्णय दिला आहे. या निर्णयावरही दोन्ही गटांनी परस्पर मत व्यक्त केले आहे. सत्ताधारी गटानुसार धर्मादाय आयुक्तांनी सर्व दावे मंजूर केले आहेत, तर विरोधी गटाच्या म्हणण्यानुसार धर्मादाय आयुक्तांनी हा निर्णय आपल्या अधिकार क्षेत्रात येत नसल्याचे सांगितले. यामुळे हा निकाल कोणाच्याही बाजूने अथवा विरोधात नसल्याचा दावा केला आहे. आता ४ जून रोजी निवडणूक होणार असल्याने वाढीव मतदान कुणाच्या पारड्यात पडते हेदेखील स्पष्ट होणार आहे.
सहा जिल्ह्यांत संस्थेचा विस्तार
मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली करण्यासाठी विनायकराव पाटील, दादासाहेब सावंत यांनी १९५८ साली समविचारी लोकांना एकत्र घेत मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. ६० वर्षांत या संस्थेचा वटवृक्ष झाला आहे. मराठवाड्यातील नांदेड व लातूर वगळता सहा जिल्ह्यांत २३ वरिष्ठ महाविद्यालये, ३७ कनिष्ठ महाविद्यालये, ५६ माध्यमिक शाळा, मराठी माध्यमाच्या १४ शाळा आणि इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिकच्या ६ शाळा, अशा संस्थेच्या एकूण १३५ शाखा आहेत.
३४३ सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळाला
संस्थेच्या कार्यकारिणीने सर्व जुन्या-नव्या सदस्यांच्या यादीसह निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र, नवीन सदस्यांच्या नावावर आक्षेप घेत धर्मादाय आयुक्तांकडे त्याविरोधात याचिका दाखल केली. मात्र, धर्मादाय आयुक्तांनी आमचे सर्व दावे मंजूर केले आहेत. यामुळे एकूण ३४३ सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळाला असून, ४ जून रोजी सकाळी १० वाजता नियोजित वेळेनुसार निवडणूक होईल.
-आ. सतीश चव्हाण, विद्यमान सरचिटणीस
आम्ही लढाई लढणार
धर्मादाय आयुक्तांनी आमची याचिका फेटाळलेली नाही. धर्मादाय कोर्टाने हे प्रकरण आमच्या अधिकार क्षेत्रात येत नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे हा कोणाच्याच बाजूने निकाल लागलेला नाही. यातच उच्च न्यायालयाला सुट्या आहेत. यामुळे पुढे याचिका दाखल करण्यास वेळ नाही. मात्र, आम्ही पुढची लढाई लढणार आहेत. सध्या सत्ताधारी गटाला फायदा झाला आहे. सोमवारी होणाºया निवडणुकीत उभे राहायचे की नाही, याचा निर्णय रविवारी घेण्यात येईल.
-पद्माकरराव मुळे, ज्येष्ठ सदस्य, मशिप्रमं