दहावीच्या परीक्षा केंद्रात शिक्षकांनीच पुरविली गणिताची मास कॉपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 02:19 PM2019-03-12T14:19:08+5:302019-03-12T14:38:05+5:30

भरारी पथकाला उत्तरांच्या ११० छायांकित स्वहस्ताक्षरातील प्रती सापडल्या आहेत.

Mass copies provided by the teachers in the 10th examination center for mathematics paper | दहावीच्या परीक्षा केंद्रात शिक्षकांनीच पुरविली गणिताची मास कॉपी

दहावीच्या परीक्षा केंद्रात शिक्षकांनीच पुरविली गणिताची मास कॉपी

googlenewsNext
ठळक मुद्देगोंदेगाव येथील स. भु. हायस्कूलमधील धक्कादायक घटनाशिक्षणाधिकाऱ्यांची कारवाई

- राम शिनगारे
औरंगाबाद : इयत्ता दहावीच्या गणित भाग-१ पेपरला शिक्षकांनीच कार्बनच्या साह्याने मास कॉपी करून विद्यार्थ्यांना पुरविली असल्याचा धक्कादायक प्रकार सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथील सरस्वती भुवन हायस्कूलमध्ये उघडकीस आला. माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या पथकाने परीक्षा केंद्राला भेट देऊन धडक कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या भेटीत उत्तरांच्या ११० छायांकित स्वहस्ताक्षरातील प्रती सापडल्या आहेत.

श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था संचालित गोंदेगाव येथील सरस्वती भुवन हायस्कूलमधील परीक्षा केंद्राला माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी.चव्हाण, जे.व्ही. चौरे, एम. आर. सोनवणे यांच्या पथकाने सोमवारी (दि.११) भेट दिली. या भेटीत उघडकीस आलेल्या धक्कादायक प्रकाराचा गोपनीय अहवाल पथकाने विभागीय मंडळाच्या सचिवांना दिला आहे. या अहवालात गंभीर बाबींचा उल्लेख करण्यात आला. अहवालातील नोंदीनुसार या केंद्रावर गणिताच्या पेपरला नोंदणी केलेल्या ३२५ विद्यार्थ्यांपैकी ३२२ जण परीक्षा देत होते. या केंद्रातून भरारी पथकाने दोन पोती नवनीत गाईड, कोहिनूर, स्पार्क गाईड, असे छापील उत्तरे असलेले साहित्य जप्त केले.

या परीक्षा केंद्रात बाहेरील व्यक्तींचा मुक्त संचार होता. पोलिसांचे अस्तित्व कोठेही जाणवत नव्हते. केंद्रसंचालक, सहकेंद्र संचालक, परीक्षा सुरू असलेल्या वर्गातील पर्यवेक्षक सरसकट ‘मास कॉपी’मध्ये सहभागी असल्याचे आढळून आले. ११० छायांकित स्वहस्ताक्षरातील प्रती वेगवेगळ्या दालनात आढळून आल्या असून, त्या जप्त केल्या आहेत. या छायांकित प्रती, स्वहस्ताक्षरातल्या प्रती शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुरवल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. परीक्षा केंद्रावर ११ पर्यवेक्षक, दोन केंद्र संचालक आणि सहकेंद्र संचालक होते; मात्र त्यापैकी एकानेही हस्ताक्षर असलेल्या प्रती कोणाच्या आहेत, याबाबत जाणीवपूर्वक नावे सांगितली नाहीत. ही नावे भरारी पथकाला मिळाली आहेत. त्या शिक्षकांची हस्ताक्षर तज्ज्ञांकडून तपासणी केल्यास सर्व बाबी स्पष्ट होतील. मास कॉपीमध्ये सहभागी असलेल्या सर्वांची विभागीय चौकशी करीत, दोषी केंद्र संचालक, सहकेंद्र संचालक आणि पर्यवेक्षकांवर ‘एमईपीएस १९८१’नुसार कारवाई करण्याची शिफारस गोपनीय अहवालात केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

याविषयी स.भु. शिक्षण संस्थेचे सचिव नंदकुमार उकडगावकर, कोषाध्यक्ष अरुण मेढेकर यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. शालेय सहसचिव मिलिंद रानडे यांच्याशी बोलणे झाले असता, त्यांनी हा विषय माझ्या अखत्यारीत येत नाही. माझ्याकडे केवळ शहरातील शाळांची जबाबदारी आहे, त्या शाळेविषयी कार्यालयाशी संपर्क साधण्यास सांगितले, तर ग्रामीण शाळांची जबाबदारी असलेले अ‍ॅड. रामेश्वर तोतला यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांचा भ्रमणध्वनी बंद असल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही.

विभागीय चौकशीची शिफारस 
गोंदेगाव येथील सरस्वती भुवन हायस्कूलमध्ये भरारी पथकाने भेट दिली. या भेटीमध्ये धक्कादायक बाबी दिसून आल्या. शाळेतील पर्यवेक्षक, केंद्र संचालक, सहसंचालक आणि शिक्षकच मास कॉपीमध्ये सहभागी असल्याचे आढळून आले. या प्रकाराची सर्व माहिती विभागीय मंडळाला कळविली. केंद्र संचालक बदलण्यात आले असून, विभागीय चौकशीची शिफारस केली आहे.
- डॉ. बी.बी. चव्हाण, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग

Web Title: Mass copies provided by the teachers in the 10th examination center for mathematics paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.