विद्यापीठात कॉपीचा योगा ‘योग’ की सर्वांगासन?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 06:07 PM2019-05-18T18:07:19+5:302019-05-18T18:10:22+5:30
परीक्षेचे चित्रीकरण मागणाऱ्यांना नेत्यांचे फोन
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील योगाशास्त्र विभागाच्या परीक्षेत उघडपणे कॉपी झाल्याचा प्रकार समोर आला होता. योगाशास्त्र सुरू असलेल्या नाट्यशास्त्र विभागात परीक्षा न घेता, फाईन आर्ट विभागात घेण्यात आल्या. या परीक्षेची व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध असून, त्यात कॉपीबहाद्दर कैद झाले आहेत. यात राजकीय नेत्यांपासून विभागप्रमुखांचा समावेश असल्याची माहिती आहे. यामुळे व्हिडिओ रेकॉर्डिंग मागणाऱ्यांवर राजकीय नेत्यांकडून दबाव टाकण्यात येत आहे.
विद्यापीठात केंद्रीय आयुषमंत्र्यांच्या हस्ते योगा विभाग सुरू करण्यात आला. या विभागाच्या समन्वयकपदी नाट्यशास्त्राचे विभागप्रमुख डॉ. जयंत शेवतेकर यांची नेमणूक करण्यात आली. योगा विभागाचे प्रमुख असताना त्यांनीच विभागात शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला. विभागप्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थी, अशी तिहेरी भूमिका त्यांनी निभावली. याविरोधात आवाज उठविल्यानंतर विभागाच्या समन्वयकपदाची जबाबदारी प्रा. स्मिता साबळे यांच्याकडे सोपविण्यात आली होती. मात्र, विभागाच्या परीक्षा नाट्यशास्त्र विभागाऐवजी फाईन आर्ट विभागात घेण्याचा निर्णय आपण घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले, तसेच नाट्यशास्त्र विभागातील परीक्षांची जबाबदारी असल्यामुळे आपण योगाच्या परीक्षेकडे गेलो नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
याविषयी प्रसारमाध्यमांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करताच गोंधळ उडाला आहे. नाट्यशास्त्र विभागाच्या परीक्षेत कॉपी केल्याप्रकरणाचा खुलासा प्रकुलगुरूंनी मागविला असतानाच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष अमोल दांडगे यांनी या गोंधळप्रकरणी कारवाईची मागणी केली, तसेच फाईन आर्ट विभागाकडे माहितीच्या अधिकारात व्हिडिओ रेकॉर्डिंग मागविण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.
योगा विभागाची परीक्षा देणाऱ्या ८० विद्यार्थ्यांमध्ये शहरातील सत्ताधारी राजकीय पक्षाचा एक नेता, विद्यापीठातील विभागप्रमुख, काही प्रतिष्ठित नागरिकांच्या पत्नींसह उच्चभ्रू व्यक्तींचा समावेश आहे. सर्वांना कॉपी करण्यासाठी मुक्त संधी देण्यात आली होती. त्यामुळे हे प्रकरण दाबण्यासाठी सर्व पातळ्यांवरून प्रयत्न सुरू झाले आहेत. यात प्रा. साबळे यांनी हात वर केल्यामुळे पूर्वाश्रमीचे विभागप्रमुख, विद्यमान विद्यार्थी आणि परीक्षार्थी डॉ. जयंत शेवतेकर यांच्याकडेच बोट दाखविण्यात येत आहे.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकुलगुरू कार्यालयाला योगा विभाग माहिती देत नाही. परीक्षा फाईन आर्ट विभागात का हलविण्यात आली, याचा साधा खुलासाही अद्याप केलेला नाही. याचवेळी एक व्यवस्थापन परिषदेचा सदस्य स्वत:ची दोन मुले परीक्षा देत असतानाही भरारी पथकामध्ये कुलगुरूंच्या आशीर्वादाने सहभागी होतो. मुले परीक्षा देत असलेल्या केंद्राला भेट देत इतरांवर कारवाई केली जाते. मात्र, स्वत:च्या मुलांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळेल, अशी तजवीज केली जाते. याविषयी मराठवाडा लॉ कृती समितीतर्फे कुलगुरूंना निवेदन देण्यात आले आहे. मात्र, सगळीकडेच मुजोरीने कळस गाठल्याचा प्रत्यय येत आहे.
दोन विभागांत कोणताही पत्रव्यवहार नाही
नाट्यशास्त्र विभागातील परीक्षा फाईन आर्ट विभागात हलविण्यात आली होती. यासाठी नाट्यशास्त्र आणि फाईन आर्ट विभागात जागा मागणीचा किंवा परवानगी दिल्याचा कोणताही पत्रव्यवहार झाला नसल्याचे समजते, तसेच या दोन्ही विभागांनी परीक्षा केंद्र बदलणे आणि परीक्षा फाईन आर्ट विभागात घेत असल्याचे शैक्षणिकप्रमुख असलेल्या प्रकुलगुरू कार्यालयाला कळविले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कुलगुरुंच्या समक्ष पुढील निर्णय होईल
फाईन आर्ट आणि योगा विभागाच्या संबंधितांकडून कागदपत्रे, परीक्षासंदर्भातील निर्णय आदीची माहिती मागविली आहे. ही माहिती सोमवारी मिळेल. त्यानंतर कुलगुरूंच्या समोर प्रकरण ठेवून पुढील निर्णय घेण्यात येतील.
-डॉ. अशोक तेजनकर, प्रकुलगुरू