औरंगाबादेत उद्या राष्ट्रगीताचे सामुहिक गायन; शहरात तब्बल १५ हजार विद्यार्थी होणार सहभागी
By विजय सरवदे | Published: August 8, 2022 06:43 PM2022-08-08T18:43:56+5:302022-08-08T18:47:28+5:30
मंगळवारी ९ ऑगस्ट हा क्रांतीदिन असून हा दिवस ‘स्वराज्य महोत्सव’ म्हणून साजरा केला जाणार आहे.
औरंगाबाद : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून मंगळवारी ९ ऑगस्ट रोजी ‘स्वराज्य महोत्सव’ उत्स्फूर्तपणे साजरा केला जाणार आहे. या महोत्सवांतर्गत सकाळी ११ वाजता संपूर्ण जिल्ह्यात एकाचवेळी सामुहिक राष्ट्रगीत गायनाचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलात तब्बल १५ हजार विद्यार्थी सामुहिक राष्ट्रगीत म्हणतील, ग्रामीण भागात नागरिक, शाळा, शासकीय कार्यालयांमध्येही सामुहिक राष्ट्रगीताचा हा उपक्रम होणार आहे.
यासंदर्भात जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी सांगितले की, मंगळवारी ९ ऑगस्ट हा क्रांतीदिन असून हा दिवस ‘स्वराज्य महोत्सव’ म्हणून साजरा केला जाणार आहे. विभागीय क्रीडा संकुलात सकाळी ९ ते १० यावेळत १५ हजार शालेय विद्यार्थी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील व राष्ट्रगीताचे सामुहिक गायन करतील. त्यानंतर ११ वाजता जिल्हा परिषदेत सामुहिक राष्ट्रगीत गायन केले जाईल. काही जि.प. शाळांचे विद्यार्थी, जि.प.चे अधिकारी, कर्मचारी विविध वेशभुषेत या उपक्रमात सहभागी होतील. ग्रामीण भागातही शाळा, ग्रामपंचायत, विविध शासकीय कार्यालये व नागरिकांनाही समुहिक राष्ट्रगीत गायन उपक्रमात सहभागी होतील.
‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबविला जाणार आहे. या कालावधीत घरे व शासकीय कार्यालयांवर तिरंगा ध्वज फडकाविला जाणार आहे. प्रत्येकाने देशाभिमान बाळगून आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवावा. यासाठी नागरिकांना तिरंगा ध्वज सहज उपलब्ध व्हावा म्हणून तो शाळा, अंगणवाडी, रेशन दुकानामार्फत विक्री केला जात आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत सुमारे सव्वादोन लाख ध्वज विक्री झाल्याचे मुख्यकार्यकारी अधिकारी गटणे यांनी सांगितले.
जि.प. मुख्यालयात साफसफाई
उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांच्या देखरेखीखाली सोमवारी दुपारपासून जि.प. मुख्यालयातील प्रांगणात साफसफाई केली जात होती. उद्या सर्व अधिकारी, कर्मचारी, पाच-दहा जि.प. शाळांचे विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतील. याशिवाय प्रायोगिकस्तरावर पाच- दहा बचत गटांचे स्टॉलही लावले जाणार आहेत. अधिकारी- कर्मचारी विविध वेशभुषेत या उपक्रमात सहभागी होणार आहेत. जि.प. मुख्यालयातील हा उपक्रम ११ वाजता सुरू होईल.