अयोध्यानगरात उभारले भव्य सामाजिक सभागृह
By Admin | Published: June 29, 2014 12:51 AM2014-06-29T00:51:49+5:302014-06-29T01:07:23+5:30
औरंगाबाद : विजय दर्डा यांच्या खासदार निधीतून उभारण्यात आलेल्या भव्य सामाजिक सभागृहाचा लोकार्पण सोहळा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात झाला.
औरंगाबाद : विजय दर्डा यांच्या खासदार निधीतून वॉर्ड क्रमांक २५ अयोध्यानगर येथील एन-७, सी-१८ व सी-२५ समोरील जागेत उभारण्यात आलेल्या भव्य सामाजिक सभागृहाचा लोकार्पण सोहळा आज सायंकाळी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.
वॉर्डातील शेकडो नागरिकांच्या साक्षीने लोकार्पण झालेल्या या सामाजिक सभागृहाच्या बांधकामाचा दर्जा उत्तम राखण्यात आल्याबद्दलही नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत होते. विशेषत: महिला वर्गाकडून उत्स्फूर्तपणे ही प्रतिक्रिया उमटली व त्यांनी राजेंद्र दर्डा यांचे याबद्दल आभारही मानले.
प्रभावती रमेश पाटील व इतर महिलांच्या हस्तेच श्रीफळ वाढवल्यानंतर सर्वांनी सभागृहात प्रवेश केला. तेथे झालेल्या छोटेखानी सभेत प्रारंभी विश्वनाथ स्वामी यांनी प्रास्ताविक केले. वॉर्डातर्फे नगरसेवक काशीनाथ कोकाटे यांनी शालेय शिक्षणमंत्र्यांचे शाल, पुष्पहार देऊन स्वागत केले, तेव्हा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होत राहिला. ‘अच्छे दिन आयेंगे’ असे म्हणणाऱ्यांकडून वेगळाच प्रत्यय येत आहे. जनतेला महागाई आणि दरवाढीचा मुकाबला करावा लागत आहे. परंतु राजेंद्र दर्डा यांनी आपल्या प्रत्यक्ष कार्यातून जनतेला खऱ्या अर्थाने अच्छे दिन आणण्याचा चंग बांधला आहे. त्यांचे मोठे बंधू विजय दर्डा यांना आपण कधी पाहिलेही नसेल; परंतु त्यांचा निधी औरंगाबादेत आणून किंवा अन्य विविध प्रकारचा निधी उपलब्ध करून ज्या झपाटल्यागत राजेंद्र दर्डा विकासकामे करीत आहेत, त्याला तोड नाही, असे उद्गार विश्वनाथ स्वामी यांनी प्रास्ताविकातून काढले.
नगरसेवक काशीनाथ कोकाटे यांनी रामलीला मैदान व वॉर्डातील इतर प्रश्नांचा ऊहापोह करीत आपणच राजेंद्र दर्डा यांच्याबरोबरच असल्याची ग्वाही दिली.
यावेळी बोलताना आपल्या भाषणात राजेंद्र दर्डा म्हणाले, सातत्याने मी आपल्या मतदारसंघात प्रामाणिकपणे विकासकामे करण्याचा प्रयत्न करतोय. पूर्व मतदारसंघात आता ड्रेनेजची कामेच शिल्लक नाहीत. लाट येते, जाते. काम करणाऱ्याने काम करीत राहावे. केलेल्या कामाचे चीज होईलच.
शिक्षण आणि दोन हातांना काम हे कसे महत्त्वाचे आहे, हेही त्यांनी यावेळी समजावून सांगितले. डीएमआयसीची फळे येत्या दोन वर्षांत बघायला मिळतील, असा विश्वास त्यांनी दाखवला.
अण्णासाहेब देठे, आर. एस. पाटील, वसंत कदम, लक्ष्मण तायडे, डी. के. कोलते, एस. बी. कुलकर्णी, प्रकाश अत्तरदे, शेषराव मोकळे, पांडुरंग आडसुळे, भास्कर लक्कस पाटील, संजीवनी हत्ते, साहेबराव घोडके, शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. विमल मापारी, आनंद इंगळे, निर्मला मैदरगे, वत्सला पाटील, संदीप लगामे, संभाजी गायकवाड, प्रेमराज पैठणे, छाया खुळे, रहिमुन्निसा शेख, सूर्यकांत राऊत यांच्यासह विलासबापू औताडे, दामूअण्णा शिंदे, राधाकृष्ण गायकवाड, अॅड. रमेशभाई खंडागळे, संतोष दीडवाले आदींची उपस्थिती होती. सामाजिक सभागृहामुळे या भागातील नागरिकांची चांगलीच सोय होणार आहे, असे अनेकांनी सांगितले.